esakal | कोरोना : दुधाची विक्री घटली 
sakal

बोलून बातमी शोधा

milk logo

जीवनावश्‍यक वस्तू म्हणून दूध व दुग्धजन्य पदार्थाला वगळण्यात आले असले तरीही आम्ही स्वच्छतेची काळजी घेतो. शेतकरी दूध वाढून लवकर निघून जातात. दुधाची विक्री कमी झाली आहे. सध्या व्यवसायापेक्षा कोरोनाचा संसर्ग रोखणे महत्त्वाचे आहे. 
- बापू गवळी, जोडभावी पेठ 

कोरोना : दुधाची विक्री घटली 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : आज सर्वत्र शुकशुकाट होता. मेडिकल, किराणा दुकाने, पेट्रोलपंप, दूध डेअऱ्या यांच्यासह जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने वगळता जनता संचारबंदीला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नेहमीच्या तुलनेत दूध संकलन लवकर होऊ लागले आहे. शेतकरी डेअरीला लवकर दूध घालून निघून जात आहेत. दुधाच्या विक्रीवर मात्र परिणाम झाल्याचे समोर येऊ लागले आहे. कर्नाटकातील काही जिल्ह्यांना सोलापूर जिल्ह्यातून दूध पुरवठा होतो. कर्नाटकातून दुधाची मागणी कमी झाली आहे. 
हेही वाचा - जनता कर्फ्यू! घरगुती विजेच्या वापरात "एवढी' वाढ 
दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अत्यावश्‍यक सेवेचे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे आजच्या जनता संचारबंदीमध्ये दूध उत्पादक, दूध वाहतूकदार व दूध विक्रेत्यांना फारशी अडचण भासली नाही. पुणे, मुंबई या शहरामध्ये कोरोनाची लागण झाल्यानंतर त्या ठिकाणी नोकरी व शिक्षणानिमित्त गेलेले लोक पुन्हा गावाकडे येऊ लागले आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सावळेश्‍वर येथील टोल नाक्‍यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. आजच्या जनता संचारबंदीमध्ये मात्र वेगळे चित्र बघायला मिळाले. मोजकी वाहने वगळता महामार्ग आणि टोलनाका ओस पडला होता. पोलिसांच्यावतीने वाहनधारकांची कसून तपासणी केली जात होती. पेट्रोलपंप, हॉटेल, ढाबे या ठिकाणी मालट्रक व इतर जड वाहतुकीची वाहने लावण्यात आली होती. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा परिसर नेहमी वाहतुकीच्या वर्दळीने गजबजलेला असतो. या ठिकाणी देखील आज शुकशुकाट होता. बाजार समितीचे मुख्य प्रवेशद्वार लावून घेण्यात आले होते. समितीच्या आवारात कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. 
हेही वाचा - रेल्वे लॉक डाऊन ! मार्चएण्डपर्यंत एकही रेल्वे धावणार नाही 
घरातील साफसफाई, कॅरम, चित्रपटाला प्राधान्य 
जनता संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी झाल्याचे दिसले. बाजार समितीच्या मागील बाजूस असलेल्या गाळा नंबर 256 वसाहतीमधील रहिवाशांनी घरातील साफसफाई, मुलांसोबत कॅरम, बुद्धिबळ खेळणे, वाचन, चित्रपट पाहण्याला प्राधान्य दिले. सध्या शाळेला सुट्टी असल्याने आणि यावर्षी पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा होणार नसल्याने मुले सुट्टीचा आनंद लुटत आहेत. या वसाहतीमधील मुलांना देखील हात धुण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांना दिवसातून वारंवार हात धुवायला सांगितले जात असल्याची माहिती श्रीरंग नादरगी, विनायक मातकूर, शिवशंकर वंगारी यांनी दिली.