esakal | नो टेन्शन : काळजी घ्या, सोलापुरातील "कोरोना' रिपोर्ट निगेटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Coronas report in Solapur is negative

"करोना'संदर्भातील उपाययोजना व सद्यःस्थितीची माहिती देण्यासाठी आज जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, महापालिका आयुक्त दीपक तावरे उपस्थित होते.

नो टेन्शन : काळजी घ्या, सोलापुरातील "कोरोना' रिपोर्ट निगेटिव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापुरात निगराणीखाली असलेल्या पाच व्यक्तींच्या थुंकीचे नमुने तपासणीस घेतले होते. त्यापैकी एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून उर्वरित चार जणांचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. गुलबर्गा येथून सोलापुरात आलेल्या 20 विद्यार्थ्यांचा आणि "कोरोना'ने मृत व्यक्तीचा संपर्क आला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 
"करोना'संदर्भातील उपाययोजना व सद्यःस्थितीची माहिती देण्यासाठी आज जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, महापालिका आयुक्त दीपक तावरे उपस्थित होते. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार महापालिका, नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. मोठ्या ग्रामपंचायतबाबत आदेशात काहीच नमूद नाही. जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतबाबत काय निर्णय घेता येईल? याची आपण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. गुलबर्गा येथील केंद्रीय विद्यापीठ हे गुलबर्गा शहरापासून 23 किलोमीटर दूर आहे. परदेशातून आलेल्या कोणत्याही नागरिकांच्या संपर्कात ते आलेले नसल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी स्पष्ट केले. 

जिल्हाधिकारी म्हणाले... 

  • संविधान बचाव कृती समितीला आंदोलन थांबवावे लागेल 
  • "सोलापूर रंगे, नेत्यांचे संगे' कार्यक्रमासाठी परवानगी नाही 
  • चित्रपटगृह सुरू परंतु तेथे गर्दी कमी 
  • संशयित रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री महत्त्वाची 
  • गर्दी टाळण्यासाठी सर्वांना सूचना 

 
गुलबर्गा येथून आलेले 20 विद्यार्थी आज घरी जाणार 
गुलबर्गा येथील केंद्रीय विद्यापीठात महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यांतील 37 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कर्नाटकात "कोरोना' संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सुटी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 20 विद्यार्थ्यांनी आपल्या गावी जाण्यासाठी राज्य सरकारकडे शनिवारी मदत मागितली होती. राज्य सरकारच्या सूचनेनुसार या विद्यार्थ्यांना आज सकाळी बसमधून गुलबर्गा येथून सोलापुरातील केगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात आणण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांच्यात "कोरोना'ची कोणतीही लक्षणे दिसली नाही. विद्यार्थ्यांना उद्या (सोमवार) त्यांच्या गावाकडे पाठविले जाणार आहे. हे विद्यार्थी चंद्रपूर, वर्धा, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

go to top