माळशिरस तालुक्‍यात कामगारांना वाचविणाऱ्या शेतकऱ्यांविरूद्धच तक्रार दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

अधिकाऱ्यांकडून पहाणी 
अतिउच्च विजेचा दाब असलेल्या नवीन वीज वाहिनीतील मनोरा पडल्यानंतर पुणे परिमंडलातील महापारेषणचे मुख्य अभियंता वंदनकुमार मेंढे यांच्याकडून आज पाहणी करण्यात आली. यावेळी पडलेले मनोरे लवकरच उभा करू, असे सांगण्यात आले. तसेच अधिकाऱ्यांच्या तक्रारीबाबत विचारले असता प्रथम मनोरे उभे करण्यास प्राधान्य राहील, असे ते म्हणाले. 

बोंडले (ता. माळशिरस, जि. सोलापूर) : खळवे (ता. माळशिरस) येथे वीजेच्या अतिउच्च दाबाच्या नवीन वाहिनीचे काम चालू असताना वीज वाहिनीचे मनोरे कोसळल्यानंतर त्यावर काम करणाऱ्या कामगारांना वाचविण्यासाठी मदत करणाऱ्या शेतकऱ्यांवरच वेळापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याने शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे. 
सध्या महाराष्ट्र राज्य विद्यूत पारेषण कंपनीच्या वतीने पंढरपूर व माळशिरस तालुक्‍यातील भाळवणी, तोंडले, बोंडले, खळवे, माळखांबी, श्रीपूर, महाळूंग, लवंग या भागात वीजेच्या अतिउच्च दाब असलेल्या नवीन वाहिनीचे काम चालू आहे. यामध्ये पायाभरणी करून मनोरे उभे करणे, मनोऱ्यांवरील तारा ओढणे आदी कामे केली जात आहेत. ता. 20 रोजी मनोऱ्यावरील तारा ट्रॅंक्‍टरने ओढण्यात येत होत्या. यावेळी पाच ते सहा मनोरे कोसळले आहेत. यापैकी खळवे हद्दीतील हनुमंत माने देशमुख व धोंडूबाई कृष्णाजी माने देशमुख यांच्या शेतातील मनोऱ्यावर कामगार काम करीत होते. मनोऱ्याबरोबर ते कामगारही कोसळले आणि मनोऱ्यात अडकले होते. यावेळी पंडितराव माने देशमुख, सुर्याजी माने देशमुख, सागर शिंदे यांच्यासह पाच ते सहा शेतकऱ्यांनी प्रयत्नातून कामगारांना मनोऱ्याच्या कचाट्यातून बाहेर काढले. यामध्ये दोन कामगार किरकोळ तर एक कामगार गंभीर जखमी झाला होता. मनोरा कोसळणे आणि कामगार जखमी होणे याचा उपस्थित शेतकऱ्यांकडून कंपनीच्या अधिकारी व कामगारांना जाब विचारण्यात आला असता. यावेळी निकृष्ठ दर्जाच्या कामावरून शेतकरी व अधिकारी यांच्यात वाद झाला. 
यावरून कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिपक लांडगे यांनी पंडितराव माने देशमुख, सुर्याजी माने देशमुख, अविनाश माने देशमुख (सर्व रा. खळवे) व सागर शिंदे (रा. बोंडले) व अनोळखी पाच ते सहा जणांनी काम करीत असताना शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली असल्याचे नमूद करून सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार वेळापूर पोलीस ठाणे येथे दाखल केली आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक जाधव करीत आहेत. 

महाराष्ट्र 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime against farmers who rescued workers in Malshis taluka