लिमयेवाडीत दागिन्यांची तर सोरेगावात मोबाईलची चोरी ! वाचा सोलापुरातील गुन्हे वृत्त 

प्रमोद बोडके 
Friday, 27 November 2020

सोलापुरातील लिमयेवाडीतील धन्वंतरी क्‍लिनिक जवळ 60 हजार रुपयांच्या सोन्याच्या चेनची चोरी झाल्याची फिर्याद सुमा अशोक जाधव (वय 19, रा. भैरुवस्ती झोपडपट्टी नंबर दोन) यांनी सलगर वस्ती पोलिसात दिली आहे. तर सोरेगावात एकाला मारहाण करून मोबाईल हिसकावून नेल्याची घटना घडली. 

सोलापूर : सोलापुरातील लिमयेवाडीतील धन्वंतरी क्‍लिनिक जवळ 60 हजार रुपयांच्या सोन्याच्या चेनची चोरी झाल्याची फिर्याद सुमा अशोक जाधव (वय 19, रा. भैरुवस्ती झोपडपट्टी नंबर दोन) यांनी सलगर वस्ती पोलिसात दिली आहे. या फिर्यादीवरून साहिल जाधव, अंबादास गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घरातील गॅस संपला म्हणून गॅससाठी पैसे आणण्याकरिता सुमा जाधव या त्यांच्या मावशीकडे गेल्या होत्या. परत येत असताना स्कूटरवरून आलेल्या आरोपींनी सुमा जाधव यांना धक्का मारून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन तोडून पळ काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

घराच्या व्यवहारातून गुन्हा दाखल 
दमाणी नगर मधील नंदिनी अपार्टमेंटमधील फ्लॅटच्या व्यवहारातून शिवीगाळ व हाणामारी झाल्या प्रकरणी जयमाला संजय राजपूत (वय 45 , सध्या रा. स्वर्णमाला सुरेशसिंग चव्हाण, गंगानगर, जगताप हॉस्पिटल मागे, देगाव रोड, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून नंदू शिवाजी दळवी, नितीन नंदू दळवी, सुनीता नंदू दळवी, संजय (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही), नंदू शिवाजी दळवी यांचा मेव्हणा व इतर चार ते पाच जणांवर (रा. इंद्रप्रस्थ अपार्टमेंट, डोणगाव रोड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सोरेगावमध्ये मोबाईलची चोरी 
विजयपूर मार्गावरून जाताना सोरेगाव दरम्यान दुचाकी बंद पडल्याने थांबलेल्या व्यक्तीला मारहाण करून त्याच्याकडून 18 हजार रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतल्याची फिर्याद श्रीकांत मल्लिकार्जुन ममदापुरे (वय 24, रा. हत्तूर, ता. दक्षिण सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली आहे. या फिर्यादीवरून एमएच 13 सीटी 4692 या क्रमांकाच्या रिक्षातील चार अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime news in and around Solapur city