तक्रार दिल्याच्या कारणावरून पती-पत्नीस जबर मारहाण; वाचा सोलापुरातील गुन्हे वृत्त 

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 4 December 2020

शेतीच्या वादातून माझ्याविरुद्ध तक्रार का दिली, म्हणून राम दत्तू पाटील व इतरांनी मिळून कविता हरिदास पवार (वय 38) आणि हरिदास तुकाराम पवार (वय 48, रा. कर्देहळ्ळी, ता. दक्षिण सोलापूर) यांना लोखंडी रॉड व लाथाबुक्‍क्‍यांनी जबर मारहाण केली. 

सोलापूर : शेतीच्या वादातून माझ्याविरुद्ध तक्रार का दिली, म्हणून राम दत्तू पाटील व इतरांनी मिळून कविता हरिदास पवार (वय 38) आणि हरिदास तुकाराम पवार (वय 48, रा. कर्देहळ्ळी, ता. दक्षिण सोलापूर) यांना लोखंडी रॉड व लाथाबुक्‍क्‍यांनी जबर मारहाण केली. ही घटना गुरुवारी सकाळी घडली असून, जखमी पवार दाम्पत्यास उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

सेंट्रिंग काम करताना पडून कामगाराचा मृत्यू 
पंढरपूर तालुक्‍यातील करकंब येथील तुषार कवडे यांच्या घराचे पहिल्या मजल्यावरील सेंट्रिंगचे काम करताना खाली पडून मल्हारी विठ्ठल वाघधरे (वय 50, रा. करकंब, ता. पंढरपूर) या कामगाराचा उपचारावेळी मृत्यू झाला. 2 डिसेंबर रोजी सायंकाळी काम करताना मल्हारी वाघधरे हे खाली पडून गंभीर जखमी झाल्याने त्यांना त्यांचा मुलगा शिवाजी वाघधरे याने बेशुद्धावस्थेत उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना गुरुवारी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

तरुणाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न 
अज्ञात कारणावरून सुरेश निरंजन मस्के (वय 26, रा. अरवत नगर, एमआयडीसी, सोलापूर) या तरुणाने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मस्के यास त्रास होऊ लागल्याने त्यास निरंजन मस्के यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

आयपीएल सट्टा प्रकरण : रोकड मिळालेल्या आरोपीस जामीन 
आयपीएल सट्टा प्रकरणात शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 38 लाख 50 हजार 300 रुपयांच्या रोख रकमेसह अटक केलेल्या दीपक घम जोशी (रा. उमा नगरी, जुनी मिल कंपाउंड, सोलापूर) या संशयित आरोपीस न्यायदंडाधिकारी देवकाते यांनी 15 हजारांच्या जातमुचलक्‍यावर जामिनावर मुक्‍त करण्याचे आदेश दिले. जोशी याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास जामीन मंजूर केला. या प्रकरणी आरोपीच्या वतीने ऍड. मंजुनाथ कक्‍कळमेली व ऍड. प्रतीक राडिया यांनी काम पाहिले. 

विनयभंगप्रकरणी आरोपीस जामीन 
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी नागेश अंबादास कांबळे (रा. सोलापूर) यास सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी 20 हजार रुपयांच्या जामिनावर तसेच हजेरी देण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला. कुमारस्वामी नगरात 1 नोव्हेंबर रोजी नागेश कांबळे याने अल्पवयीन मुलीला अश्‍लील शब्द बोलून शिवीगाळ केली होती म्हणून जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी कांबळे यास अटक केली होती. या प्रकरणी आरोपीच्या वतीने ऍड. अजमोद्दीन शेख, ऍड. सैफोद्दीन शेख, ऍड. समीर चव्हाण व ऍड. सद्दाम पिरजादे यांनी काम पाहिले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime news in and around Solapur city