"शिक्षक'साठी झाले क्रॉस व्होटिंग ! "पदवीधर'साठी लाड तर "शिक्षक'मधून सावतांना पसंती

pune-padwidhar
pune-padwidhar

सोलापूर : पुणे पदवीधरमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड तर कॉंग्रेसचे जयंत आसगावकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते. तर भाजपकडून संग्राम देशमुख आणि जितेंद्र पवार यांनी निवडणूक लढविली. या निवडणुकीत "विकास'ची एकजूट पहायला मिळाली. मात्र, शिक्षकांमधून दत्तात्रय सावंत तर पदवीधरमधून अरुण लाड यांना मतदारांनी पसंती दिल्याची चर्चा सोलापुरात सुरू आहे. आता निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकमेकांचे विरोधक दिसले एकत्र 
शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी ठरलेले शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार दिलीप माने, अपक्ष उमेदवार महेश कोठे हे पदवीधर व शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीत प्रचारानिमित्त एकत्र आल्याचे दिसले. तर शिवसेनेचे दोन्ही उमेदवार नसतानाही जिल्हाप्रमुख गणेश वानकर, पुरुषोत्तम बरडे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, युवकचे शहराध्यक्ष जुबेर बागवान यांनी मतदान वाढविण्यासाठी एकत्रित प्रयत्न केल्याचेही पहायला मिळाले.

पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविणारे महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे होते. मात्र, राज्यात शिवसेनेला सोबत घेऊन दोन्ही पक्षांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. या पार्श्‍वभूमीवर आज (मंगळवारी) शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचाराचे काम केले. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस विशेषत: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांशी जवळीकता असलेले आमदार दत्तात्रय सावंत यांना उमेदवारी निश्‍चित मानली जात होती. मात्र, कॉंग्रेसने परस्पर उमेदवारी जाहीर केल्याने पेच निर्माण झाला आणि सावंतांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीपूर्वी कॉलेज कर्मचारी युनियनने विविध मागण्यांसाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. मात्र, अजित पवारांनी मध्यस्थी करताच तो बहिष्कार मागे घेतला. परंतु, त्यांनी पदवीधरमधून अरुण लाड आणि शिक्षकमधून दत्तात्रय सावंतांना पाठिंबा जाहीर केल्यानेही चर्चा झाली. एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनीही आमदार सावंतांनाच पसंती दिली. निवडणुकीनंतर क्रॉस व्होटिंगची चर्चा सुरू झाली असून पदवीधरमधून भाजपचे संग्राम देशमुख तर महाविकास आघाडीचे अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघातून दत्तात्रय सावंत व भाजपचे उमेदवार जितेंद्र पवार यांच्यात खरी लढत झाल्याचीही चर्चा असून त्यात सावंतांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. 


ठळक बाबी... 

  • भाजपचे शिक्षक उमेदवार जितेंद्र पवार वगळता अन्य उमेदवारांची सोलापुरकडे पाठ
  • महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिल्या नु.म.वी., हिंदुस्थान, सेंट जोसेफ व हरिभाई देवकरण प्रशालेतील केंद्रांना भेटी
  • माजी महापौर नलिनी चंदेले, संजय हेमगड्डी, अलका राठोड, हेमा चिंचोळकर यांनी सांभाळली बूथची जबाबदारी
  • प्रणिती शिंदे, गणेश वानकर, विठ्ठल वानकर, प्रकाश वाले, महेश कोठे, पुरुषोत्तम बरडे, जुबेर बागवान, संतोष पवार, चेतन नरोटे, विनोद भोसले यांनीही केंद्रांची केली पाहणी
  • मतदान केंद्रांवर पोलिसांच्या तुलनेत होमगार्ड यांनी सांभाळली बूथ यंत्रणा; हॅण्डग्लोज दिसलेच नाही
  • काही केंद्रांवर मतदारांच्या रांगा; प्रतीक्षालय अन्‌ वेब कास्टिंगही पहायला मिळाले नाही; शुटिंगची होती व्यवस्था 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com