esakal | महापुरात पंढरपूर तालुक्‍यातील 25 ते 30 लाख टन ऊसाचे नुकसान 
sakal

बोलून बातमी शोधा

Damage of 25 to 30 lakh tonnes of sugarcane in Pandharpur taluka during floods

घोंगडे गल्ली, कालिकादेवी चौक, तांबडा मारुती, काळा मारुती, महात्माफुले चौक, गजानन महाराज मठ आदी भागातही पुराच्या पाण्यामुळे दुकानदार आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करुन शासनाने तातडीने भरीव मदत करावी अशी मागणी व्यवासियक आणि पूरग्रस्त नागरिकांनी केली आहे. 

महापुरात पंढरपूर तालुक्‍यातील 25 ते 30 लाख टन ऊसाचे नुकसान 

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : अतिवृष्टी आणि महापुरामुळे पंढरपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एका रात्रीत आलेल्या भीमा नदीच्या पुराच्या पाण्यात ऊस, केळी, पपई, डाळिंब यासह इतर अनेक पिके वाहून गेली. वर्षभर कष्टानं जोपासलेली पिके डोळ्या देखीत वाहून गेल्याने शेतकऱ्याचं काळीज ही पुराच्या पाण्याने करपून गेले आहे. पंढरपूर तालुक्‍यातील 95 गावातील सुमारे 30 हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 
पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरु करण्यात आले आहेत. प्राथमिक माहिती आणि नजर अंदाजानुसार जवळपास 30 ते 32 हजार हेक्‍टर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे तर भीमा नदीकाठच्या जवळपास 25 ते 30 लाख टन ऊसाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे साखर कारखान्यांपुढे ऊस गाळपाचा प्रश्न निर्माण होणार आहे. महापूर आणि अतिवृष्टीमुळे तालुक्‍यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. 
मागील चार ते पाच दिवस अतिवृष्टी झाली होती. त्यातच उजनी आणि वीर धरणातून भीमानदीत सुमारे तीन लाख क्‍युसेक पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे नदीला महापूर आला होता. महापूरामध्ये शेती आणि शहरातील उद्योग व्यवसायिकांची अपरिमीत अशी हानी झाली आहे. 
भीमा नदीला आलेल्या पुराचा तालुक्‍यातील नदीकाठच्या 45 ते 50 गावांना सर्वाधिक फटका बसला आहे. शेती पिकांबरोबरच नदी काठी असलेल्या घरांचे आणि जनावरांच्या गोठ्याचं ही नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाच्या माहितीनुसार जवळपास शहर व तालुक्‍यातील 14 ते 15 हजार घरांमध्ये पुराचे पाणी घुसले होते. पाण्यामुळे अनेकांचे संसार वाहून गेले. जवळपास 1 हजार लहान मोठी जनावरे दगावली तर सात जणांचे पुराच्या पाण्यामुळे आणि अतिवृष्टीमुळे प्राण गेले आहेत. 
पंढरपूर परिसरात पाच ते सहा साखर कारखाने आहेत. दरवर्षी 45 लाख टन उसाचे गाळप केले जाते. सर्वाधिक ऊस उत्पादक तालुका म्हणून पंढरपूरची ओळख आहे. याच उसाच्या खोऱ्यात यावर्षी महापूर आणि अतिवृष्टीने उसाचे अक्षरश: चिपाड झाले आहे. अनेक ठिकाणी उसाचे पीक मुळासह उपटून गेले आहे. तोडणीस आलेला ऊस आडवा झाल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. उसाची ही अवस्था असतानाच दुसरीकडे केळी, पपई या फळ बागांचेही मोठ नुकसान झाले आहे. चिंचोली भोसे येथील शेतकरी प्रशांत शिंदे यांची तीन एकर केळीची बाग पुराच्या पाण्यात वाहून गेली. यामध्ये त्यांचे दहा ते बारा लाखांचे नुकसान झाले आहे. येथील निलेश पवार यांची दोन एकर पपईची आणि तीन एकर केळीची बाग देखील पुरात बुडाली आहे. हातातोंडीशी आलेला खास पुराने हिरावून गेल्याने पवार या उमद्या शेतकऱ्याचे स्वप्नही पुराच्या पाण्यात वाहून गेलं आहे. निलेशनं मोठ्या कष्टाने आणलेली बाग पुराच्या पाण्यामुळे आता कुजू लागली आहे. पिक जोपासण्यासाठी घेतलेले बॅंकेचे तीन लाख रुपयांचे कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. 
शेतकऱ्यांबरोबर शहरातील व्यापारी आणि छोट्या मोठ्या व्यवसायिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. येथील व्यावसायिक युवराज भारत काळे यांच्या विश्व इंडस्ट्री या फर्निचर दुकानालाही महापुराचा मोठा फटका बसला आहे. नदीकाठी असलेल्या त्यांच्या दुकानात अनाचक पाणी शिरल्याने अनेक किंमती मशनिरी आणि फर्निचर पाण्यात बुडाले आहे. यामध्ये त्यांचे जवळपास 38 ते 40 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 

संपादन : वैभव गाढवे