अतिवृष्टीत नुकसान 60 कोटीचे अन्‌ भरपाई मिळाली 21 कोटींची, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आंदोलनाच्या तयारीत 

प्रमोद बोडके
Thursday, 19 November 2020

मोहोळ तालुक्‍यातील प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा फटका तालुक्‍यातील शेतकऱ्यांना बसता कामा नये. शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळालीच पाहिजे. मोहोळच्या प्रशासनाने केलेल्या कारभाराची माहिती सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना मी दिली आहे. पालकमंत्र्यांनी यामध्ये स्वतः लक्ष घालावे अशी मागणीही मी त्यांच्याकडे केली आहे. येत्या आठ ते दहा दिवसात हा प्रश्‍न सुटला नाही तर तालुक्‍यातील शेतकऱ्यांसोबत प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले जाईल. 
- राजन पाटील, माजी आमदार, मोहोळ 

सोलापूर : कधी नव्हे ते यंदा पावसाने जूनपासूनच चांगली हजेरी लावण्यास सुरुवात केली. त्यामुळे यंदाच्या खरिपातून चार पैसे हातात मिळतील अशीच अपेक्षा शेतकऱ्यांना होती. ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. निसर्गाच्या आस्मानी संकटानंतर आता मोहोळ तालुक्‍यातील शेतकरी प्रशासनाच्या सुलतानी संकटाचा सामना करत असल्याचा आरोप मोहोळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी केला आहे.

मोहोळ तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे किमान 60 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, प्रशासनाने शासनाला सादर केलेल्या चुकीच्या आकडेवारीमुळे मोहोळ तालुक्‍यातील शेतकऱ्यांना भरपाई पोटी फक्त 21 कोटी रुपये मिळाले असल्याची माहितीही माजी आमदार पाटील यांनी दिली. 

माजी आमदार पाटील म्हणाले, अतिवृष्टी व महापुरात झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले. मोहोळ तालुक्‍यातील प्रशासनाने मात्र नुकसानीच्या पंचनाम्यामध्ये कागदी घोडे नाचविले त्यामुळे तालुक्‍यातील नुकसानीची योग्य माहिती व आकडेवारी सरकारपर्यंत पोहोचली नाही. प्रशासनाच्या या नाकर्तेपणाचा सर्वात मोठा फटका मोहोळ तालुक्‍यातील शेतकऱ्यांना बसत आहे.

शेतकऱ्यांवर होणारा हा अन्याय आम्ही कधीही सहन करणार नाही. प्रशासनाने तत्काळ यामध्ये दुरुस्ती करावी अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन मोहोळ तालुका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही माजी आमदार राजन पाटील यांनी दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage due to heavy rains was Rs 60 crore and compensation was Rs 21 crore, Former NCP MLA Rajan Patil preparing for the agitation