`या` शहरात पंडितजी गायब झाले आणि.... 

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 27 मे 2020

 विमुक्त जमातीचे पहिले अधिवेशन सोलापुरात
अखिल भारतीय विमुक्त जमातीचे पहिले अधिवेशन सोलापुरात झाले. त्यावेळीही पंडितजी या अधिवेशनाला उपस्थित होते. अधिवेशनाचे संयोजक तथा माजी महापौर (कै.) भीमराव जाधव गुरुजी व त्यांच्या समाजबांधवांनी केलेल्या विनंतीला मान देऊन 12 एप्रिल 1960 रोजी आयोजिलेल्या अधिवेशनास पंडितजी आले होते.

सोलापूर :  जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानात मुक्कामी असलेले भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू पहाटे अचानक गायब झाले आणि तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांसह संपूर्ण पोलिस यंत्रणा हादरली. काही वेळानंतर ते पुन्हा जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या प्रवेशद्वारासमोर आले आणि सर्वांनीच सुटकेचा निःश्‍वास सोडला..... ज्येष्ठ पत्रकार व्ही. आर. कुलकर्णी यांच्या "शतकान्वय' या पुस्तकातील ही आठवण.

 

उद्या (बुधवारी) पंडित नेहरू यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त नेहरूंच्या सोलापूर दौऱ्यातील काही आठवणींचा हा झरोका. सोलापुरातील दुष्काळावेळी आणि अखिल भारतीय विमुक्त जमातीच्या अधिवेशनास नेहरू उपस्थित होते. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी 1952 मध्ये पंडितजी सोलापुरात आले होते. शासकीय विश्रामधाममध्ये त्यावेळी तितक्‍याशा सुविधा नव्हत्या. त्यामुळे पंडितजींच्या राहण्याची व्यवस्था जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानात करण्यात आली. दयानंद महाविद्यालयासमोरील मोकळ्या जागेतील जाहीर सभेनंतर ते परतणार होते. रात्री जिल्हाधिकारी झुबेरी यांच्या निवासस्थानात मुक्काम होता.

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: २ लोक, मजकूर

पहाटेच्या वेळी पंडितजींच्या खोलीचा दरवाजा उघडा दिसला. त्यामुळे पहारेकऱ्याने डोकावून आत पाहिले तर त्या ठिकाणी पंडितजी नव्हते. ते कॉटवर, खोलीत किंवा स्वच्छतागृहातही नव्हते. हे पाहिल्यावर पहारेकरी गडबडला, घामाघूम झाला. झोपलेल्या पोलिसांना त्याने उठवले, तेही घाबरले. जिल्हाधिकारीही घामाघूम झाले. त्यांनी तातडीने डीएसपींना बोलावले, सर्व रस्त्यांवर त्यांना शोधण्यासाठी पोलिस गेले. जिल्हाधिकारी व पोलिसांची तारांबळ उडाली असताना पंडितजी हरिभाई देवकरण प्रशालेसमोरील रस्त्यावर स्वच्छता करणाऱ्या तत्कालीन नगरपालिकेच्या झाडूवाल्या कर्मचाऱ्यांशी गप्पा मारण्यात दंग होते. विशेष म्हणजे, पोलिसांचे वाहन याच रस्त्यावरून वेगाने गेले, पण त्यांचे लक्ष गेले नाही. पंडितजी जवळपास 10 ते 15 मिनिटे त्या महिलांशी बोलत होते, त्यांच्या जीवनाची माहिती घेत होते. ते पुढे चालत निघाले, डफरीन चौकापर्यंत या झाडूवाल्या महिलाही त्यांच्यासोबत चालत होत्या. त्यानंतर काही वेळाने पंडितजी जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या प्रवेशद्वारासमोर आले आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. पंडितजी सामान्य आणि गरीब वर्गाच्या जीवनापर्यंत पोचत, त्यांच्या अडचणी जाणत, हेच या घटनेतून दिसून आले.

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: ३ लोक, लग्न सोहळा आणि आंतरिक
सोलापूर : येथे 12 एप्रिल 1960 रोजी झालेल्या अखिल भारतीय विमुक्त जमातीच्या पहिल्या अधिवेशनाप्रसंगी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू, यशवंतराव चव्हाण, भीमराव जाधव गुरुजी व केशवलाल शहा. (छायाचित्र सौजन्य : भारत जाधव, सोलापूर) 

 विमुक्त जमातीचे पहिले अधिवेशन सोलापुरात
अखिल भारतीय विमुक्त जमातीचे पहिले अधिवेशन सोलापुरात झाले. त्यावेळीही पंडितजी या अधिवेशनाला उपस्थित होते. अधिवेशनाचे संयोजक तथा माजी महापौर (कै.) भीमराव जाधव गुरुजी व त्यांच्या समाजबांधवांनी केलेल्या विनंतीला मान देऊन 12 एप्रिल 1960 रोजी आयोजिलेल्या अधिवेशनास पंडितजी आले होते. त्यांच्यासमवेत यशवंतराव चव्हाणही होते. विमुक्त समाजाने वाममार्गाकडे न जाता उद्योगव्यवसाय करावा, त्यासाठी लागणारा पैसा शासनाकडून दिला जाईल, असे आश्‍वासन दिले. पंडितजींच्या दौऱ्यानंतर लवकरच सेटलमेंटच्या काटेरी कुंपणातून विमुक्त समाजाची सुटका झाली. 

विमुक्त समाजाच्या अधिवेशनासाठी पंडितजी सेटलमेंटमध्ये आले होते. त्यावेळी मी त्यांच्या स्वागतासाठी वडिलांसमवेत (भीमराव जाधव गुरुजी) उभा होतो. ते आमच्याजवळ आले, त्यांनी माझ्या गालावरून हात फिरवला व ते वडिलांसमवेत व्यासपीठाकडे गेले. पंडितजींना व्यासपीठापर्यंत जाण्यासाठी मोटारीची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, ते दुतर्फा उभे असलेल्या लोकांच्या शुभेच्छा स्वीकारत व्यासपीठाकडे गेले. ही माझ्या जीवनातील अविस्मरणीय घटना आहे. 
- भारत जाधव, माजी नगरसेवक  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: death anivarsary of first prime minister pandit jawaharlal neharu visit solapurspecial story