esakal | विधानसभेचे पराभूत उमेदवार पक्षापासून दूरच ! शिवसेनेत वाढली गटबाजी; नाराजांना राष्ट्रवादीकडून ऑफर 

बोलून बातमी शोधा

Mane_Sopal_Bagal}

जिल्ह्यात शिवसेनेचे चार जिल्हाप्रमुख आणि एक शहरप्रमुख असून, प्रत्येक तालुक्‍यासाठी एक तालुकाप्रमुख आहे. राज्याच्या सत्तेची दोरी पक्षाच्या अध्यक्षांकडे असतानाही संघटितपणे लोकांचे प्रश्‍न सोडविण्यापेक्षा श्रेयवाद आणि गटबाजी वाढू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

विधानसभेचे पराभूत उमेदवार पक्षापासून दूरच ! शिवसेनेत वाढली गटबाजी; नाराजांना राष्ट्रवादीकडून ऑफर 
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यात शिवसेनेचे चार जिल्हाप्रमुख आणि एक शहरप्रमुख असून, प्रत्येक तालुक्‍यासाठी एक तालुकाप्रमुख आहे. राज्याच्या सत्तेची दोरी पक्षाच्या अध्यक्षांकडे असतानाही संघटितपणे लोकांचे प्रश्‍न सोडविण्यापेक्षा श्रेयवाद आणि गटबाजी वाढू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी पक्षनिष्ठा खुंटीला टांगून शिवसेनेचे आलेले उमेदवारही पक्षीय राजकारणापासून चार हात लांबच असल्याची चर्चा आहे. अशावेळी पक्षातील नाराजांचा शोध घेऊन त्यांना भाजपमध्ये जाण्यापेक्षा आमच्याकडे या, अशी ऑफर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मिळत असल्याचीही चर्चा आहे. 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांना पक्षात घेतले. त्यानंतर करमाळ्याच्या रश्‍मी बागल यांना राष्ट्रवादी सोडायला लावली. मोहोळमध्ये भाजपचे नागनाथ क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री दिलीप सोपल हेदेखील शिवसेनेत आले. निवडणुकीतील पराभवानंतर यातील एकही नेता पक्षकार्यात सक्रिय दिसत नाही. उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करणाऱ्यांना पक्षातून काढून टाकल्याचे त्या वेळी सांगण्यात आले. मात्र, अजूनही ते नेते पक्षासाठीच काम करत असल्याची चर्चा आहे. 

दरम्यान, शहरातील पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत कुरघोडीमुळे वैतागलेले महेश कोठे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. तर विधानसभेला बंडखोरी केलेले मनोज शेजवाल यांनी थेट जिल्हाप्रमुखांनाच टार्गेट केले आहे. अन्य कोणत्याही पक्षात असे नाही की, चार जिल्हाप्रमुख शिवसेनेकडे आहेत. तरीही जुन्या- नव्यांमधील संघर्ष सुरूच आहे. या पार्श्‍वभूमीवर माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, प्रताप चव्हाण, अस्मिता गायकवाड, हरिभाऊ चौगुले असे अनेकजण पक्षात नावालाच असून काहींना काढून टाकल्याची चर्चा असल्याने तेही पक्षाचे काम करत नाहीत. 

मुख्यमंत्र्यांकडून नारायण पाटलांना कानमंत्र 
ग्रामपंचायत निवडणुकीनंतर करमाळा तालुक्‍यात शिवसेनेने बहुतांश गावांमध्ये यश मिळवत भगवा फडकावला. विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी पक्षात दाखल झालेल्या रश्‍मी बागल या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना ताब्यातून गेल्यानंतर पक्षीय राजकारणातून बाजूला गेल्याची चर्चा आहे. विधानसभेत बंडखोरी केल्यानंतरही पक्षाचे काम सुरू ठेवून ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केल्याबद्दल मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार नारायण पाटील यांना मातोश्रीवर बोलावून घेतले होते. त्या वेळी जिल्ह्यातही तुम्ही लक्ष द्यावे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिल्याची चर्चा आहे. 

शिवसेना व युवासेना प्रमुखांना मिळेना वेळ 
राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसबरोबरच विरोधातील भाजपला टक्कर देण्यासाठी शिवसेनेला पक्षीय संघटन मजबूत करावे लागणार आहे. मात्र, विद्यमान मंत्रिमंडळात पक्षप्रमुख स्वत: मुख्यमंत्री असून युवसेना प्रमुख पर्यावरण मंत्री आहेत. त्यांना पक्षाच्या कार्यक्रमांसाठी वेळ देता येत नसल्याचे चित्र असून उर्वरित मंत्रीदेखील स्वत:च्याच मतदारसंघात सक्रिय आहेत. त्यामुळे संपर्क प्रमुखाविना असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेची मदार माजी मंत्री दिलीप सोपल, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, पुरुषोत्तम बरडे, धनंजय डिकोळे आणि संभाजी शिंदे यांच्यासह आमदार शहाजी पाटील, माजी आमदार दिलीप माने, रश्‍मी बागल, नागनाथ क्षीरसागर आणि शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, महिला आघाडीप्रमुख अस्मिता गायकवाड व महिला संघटक शैला गोडसे यांच्यावर आहे. या सर्वांनी जुन्या- नव्यांना एकत्रित करून त्यांची नाराजी दूर न केल्यास निश्‍चितपणे आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला मोठा फटका बसेल, अशीही चर्चा आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल