आचारसंहितेचा भंग ! खासदार जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी 

Mahaswami
Mahaswami

पंढरपूर (सोलापूर) : पदवीधर, शिक्षक मतदार संघाच्या मतदानाच्या वेळी काल (मंगळवारी) सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी थेट मतदान केंद्रात जाऊन पाहणी केली. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पंढरपूर शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी केली आहे. 

येथील द. ह. कवठेकर प्रशालेत पदवीधर, शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्र होते. काल दुपारी मतदान प्रक्रिया सुरू असताना दुपारी तीन वाजून 20 मिनिटाच्या सुमारास भारतीय जनता पक्षाचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी या मतदान केंद्राच्या आवारात पाहणीसाठी आले. पुढे त्यांनी मतदान केंद्रात प्रत्यक्ष जिथे मतदान प्रक्रिया सुरू होती त्या वर्गात प्रवेश करून पाहणी केली. हा प्रकार पाहून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पंढरपूर शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी, मतदान केंद्रात प्रवेश करण्यासाठी आवश्‍यक परवानगी आहे का, अशी विचारणा खासदारांकडे केली. परंतु खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याकडून समाधानकारक उत्तम मिळाले नाही. 

निवडणूक कर्मचारी आणि संबंधित अधिकाऱ्यांशिवाय परवानगी खेरीज कोणालाही मतदान केंद्रात प्रवेश करता येत नाही. असे असताना भारतीय जनता पक्षाचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी थेट मतदान केंद्रात कसा प्रवेश केला, याविषयी आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष श्री. मांडवे यांनी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या विरोधात आदर्श आचारसंहितेचा भंग केल्यामुळे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

श्री. मांडवे म्हणाले, या प्रकरणी आपण प्रांत अधिकारी सचिन ढोले यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून त्यांच्याकडे तक्रार केली होती. आज सोलापूर येथे जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना भेटून यासंदर्भात खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना पदावरून निलंबित करावे, अशा प्रकारची मागणी आपण करणार असल्याचे त्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

या प्रकरणी केंद्राध्यक्षांकडून अहवाल मागवला असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com