मायक्रो फायनान्स, बॅंकांकडून सक्तीची कर्जवसुली; "यांनी' केली मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार

Micro Finance
Micro Finance

सांगोला (सोलापूर) : कोरोनाचा सर्वांत मोठा फटका छोटे-मोठे व्यावसायिक, हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब जनतेस बसला आहे. रोजगार बुडाल्यामुळे अक्षरशः उपासमारीची वेळ जनतेवर आलेली पाहायला मिळत आहे. कोरोनाचा उद्रेक वाढला असून, अशा परिस्थितीतही फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी शहरासह ग्रामीण भागात जाऊन कर्ज वसुलीचा तगादा लावत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

लॉकडाउन नियम मोडून सक्तीने कर्जवसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स, फायनान्स, बॅंकांना नोटिसा काढून सक्तीची वसुली थांबवावी आणि कर्जाचे हप्ते भरण्यासाठी 1 जानेवारी 2021 पर्यंत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

निवेदनात म्हटले, की गेल्या 15 दिवसांपासून सांगोला शहर व तालुक्‍यात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. हाताला काम नसल्याने हजारो कुटुंबांची उपासमार सुरू आहे. गेल्या पाच महिन्यांपासून आर्थिक संकट ओढवले आहे. अशा बिकट परिस्थितीत मायक्रो फायनान्स, फायनान्स व बॅंकांनी ग्राहकांकडे कर्ज हप्त्याच्या वसुलीसाठी तगादा लावला आहे. तसेच कर्जाचे हप्ते गोळा करण्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. कोरोनामुळे यापूर्वी हप्ते भरण्यासाठी 1 सप्टेबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र सध्या कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे, तसेच गोरगरिबांच्या हाताला काम नसल्याने मायक्रो फायनान्स, फायनान्स व बॅंकांच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी 1 जानेवारी 2021 पर्यंत मुदतवाढ मिळावी. 

कोरोनाच्या संकटकाळात गोरगरीब कुटुंबांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मायक्रो फायनान्स, फायनान्स व बॅंकांची सक्तीची वसुली थांबविण्याचे आदेश द्यावेत. मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून वाटप करण्यात येत असलेल्या कर्जाच्या जाळ्यात राज्यातील शेतकरी व शेतमजूर अडकले असून, कर्ज वसुलीसाठी लावण्यात येत असलेला तगादा आणि धमक्‍यांनी शेतकरी धास्तावले आहेत. मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणारी जुलमी वसुली तातडीने थांबवावी, अशी मागणी श्री. केदार-सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तहसीलदारांना याबाबतचे निवेदन दिले आहे. या वेळी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, प्रवीण नवले, गोपाळ भोसले, राजू कोळी, अमोल जगताप, महेश कोळी, शकील शेख, मनोज चौधरी, सूरज चौधरी आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com