तोंडावरील मास्क आला गळ्यात ! "या' तालुक्‍यात उडाली कोरोनाची भीती

राजशेखर चौधरी 
Friday, 11 September 2020

नागरिकांची आर्थिक अडचण व ओढाताण तसेच मागणी लक्षात घेऊन लॉकडाउन काळात निर्बंध घातलेली एकेक गोष्ट विविध उपाययोजना व अटी जारी करीत सुरू करण्यात आली आहे. पण काही नागरिक मात्र याचा सोयीस्कर अर्थ काढून बिनधास्तपणे कोरोनाचे सर्व प्रतिबंध, नियम मोडत आपले रोजचे व्यवहार सुरू ठेवत आहेत. सर्वात सुरक्षित उपाय असलेले तोंडाला लावायचे मास्क आता गळ्याला आले आहे तर येत्या काळात ते घरात जाण्याची शक्‍यता आहे. 

अक्कलकोट (सोलापूर) : देशभरात व महाराष्ट्रासह अक्कलकोट तालुक्‍यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असूनही लोकांच्या मनात भीतीची भावना कमी होत असल्याचे जाणवत आहे. तसेच कोरोना सुरक्षेचे उपाय जसे मास्क, सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझरचा वापर 70 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त लोकांनी बंद केल्यातच जमा असल्याने येत्या काळात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. 

नागरिकांची आर्थिक अडचण व ओढाताण तसेच मागणी लक्षात घेऊन लॉकडाउन काळात निर्बंध घातलेली एकेक गोष्ट विविध उपाययोजना व अटी जारी करीत सुरू करण्यात आली आहे. पण काही नागरिक मात्र याचा सोयीस्कर अर्थ काढून बिनधास्तपणे कोरोनाचे सर्व प्रतिबंध, नियम मोडत आपले रोजचे व्यवहार सुरू ठेवत आहेत. सर्वात सुरक्षित उपाय असलेले तोंडाला लावायचे मास्क आता गळ्याला आले आहे तर येत्या काळात ते घरात जाण्याची शक्‍यता आहे. सुरक्षित अंतर तर कुठेच पाळले जात नाही. खरेदी व बाजारहाट या गोष्टी बिनदिक्कत सुरू आहेत. अक्कलकोट शहर व ग्रामीण भागात आता मास्क दहापैकी तीन-चार जणांकडेच दिसत आहेत. रोजचे सर्व व्यवहार करायला परवानगी जरी असली तरी ते नियम पाळूनच करायचे आहे, याची आठवण मात्र कोणाला होईनासे झाले आहे. 

अक्कलकोट तालुक्‍यात यावर नियंत्रण ठेवणारी प्रशासन यंत्रणा, आरोग्य विभाग व पोलिस प्रशासन यांनी कडक भूमिका घेऊन नियम सक्तीने पाळले जावे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे; मात्र ते होताना दिसत नाही. सर्व व्यापारी व ग्राहक दोघेही दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. मग हे असेच सुरू राहिले तर महामारी आटोक्‍यात कशी येणार? लोकांच्या नजरा लसीकडे लागलेल्या आहेत पण तोपर्यंत सुरक्षित राहण्यासाठी नियमसुद्धा पाळावे लागतील, याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. 

अक्कलकोटला एकूण 827 रुग्णांपैकी 41 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्याचा दर जवळपास 4.96 टक्के इतका आहे आणि तो खूपच जास्त आहे. तो कमी करणे गरजेचे आहे. कोरोनाबधित रुग्ण लवकरात लवकर ट्रेसिंग होणे आणि त्यांची तपासणी होणे गरजेचे आहे. नागरिक सुद्धा स्वतःला त्रास होत असेल तर तातडीने तपासणीसाठी पुढे येणे गरजेचे आहे. तपासणी मोठ्या प्रमाणावर होत नसल्याने अनेक रुग्ण अद्याप शोधणे कठीण जात आहे. 

आजपर्यंतची कोरोनाबधित आकडेवारी व कंसातील टक्केवारी पुढीलप्रमाणे : एकूण 827 रुग्णांपैकी बरे झालेले रुग्ण 706 (85.37) एवढी असून सध्या उपाचार सुरू असलेले रुग्ण 80 (9.67) टक्के एवढे आहेत तर मृत्यू झालेले रुग्ण 41 (4.96) एवढे आहेत. यावरून उपचार सुरू असलेले रुग्ण कमी असले तरी मृत्यूदर मात्र सर्वात जास्त आहे. यासाठी सर्व सोयींनीयुक्त व वैद्यकीय पथकांसह स्वतंत्र कोविड दवाखाना होणे आवश्‍यक आहे; जेणेकरून येथेच चांगले उपाचार वेळेवर उपलब्ध होतील. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Despite being a patient in Akkalkot Coronas fears were lessened