सरकार कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी लपवतेय का?

अशोक मुरुमकर
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

कोरोनाला रोखण्यासाठी देशात सध्या लॉकडाउन सुरू आहे. दरम्यानच्या काळात कोरोनाबाबत कोणीही खोटी माहिती पसरवू नये म्हणून कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अधिकृत आकडेवारी आल्याशिवाय त्यावर कोणीही विश्‍वास ठेवत नाही. कोरोनाच्या रुग्णांबाबत प्रत्येक जिल्ह्यात संबंधित अधिकारी आकडेवारी पत्रकारांकडे जाहीर करतात.

सोलापूर : संपूर्ण जग कवेत घेतलेल्या कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात हातपाय पसरले आहे. राज्य सरकारच्या संकेतस्थळानुसार राज्यातील ३२ जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्याला रोखण्यासाठी सरकार वेगवेगळे प्रयत्न करत आहे. मात्र, अद्याप त्याला यश आलेले नाही. दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 
कोरोनाला रोखण्यासाठी देशात सध्या लॉकडाउन सुरू आहे. दरम्यानच्या काळात कोरोनाबाबत कोणीही खोटी माहिती पसरवू नये म्हणून कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अधिकृत आकडेवारी आल्याशिवाय त्यावर कोणीही विश्‍वास ठेवत नाही. कोरोनाच्या रुग्णांबाबत प्रत्येक जिल्ह्यात संबंधित अधिकारी आकडेवारी पत्रकारांकडे जाहीर करतात. काही ठिकाणी तर संबंधित अधिकारी फेसबुकवर व्हिडीओ करून आकडेवारी जाहीर करत आहेत. याचबरोबर कोरोनाची आकडेवारी सरकारच्या संकेतस्थळावर सुद्धा जाहीर केली जात आहे.

मात्र, या आकडेवारीत आणि पत्रकारांना देण्यात आलेल्या आकडेवारीत तफावत जाणवत आहे. त्यामुळे कोरोनाची खरी आकडेवारी लपवली तर जात नाही ना, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. वर्तमानपत्राच्या आकडेवारीनुसार राज्यातील ३२ जिल्ह्यांमध्ये सध्या ७२०५ कोरोनाबाधित रुग्ण आहेत तर सरकारच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार ६४२७ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यामध्ये ७७८ रुग्णांची तफावत आहे. वर्तमानपत्राची आकडेवारी ही २३ एप्रिल रात्री १०.३० पर्यंतची आहे. तर संकेतस्थळावरील आकडेवारी ही २४ एप्रिल सायंकाळी ५.३० वाजताची आहे. हे संकेतस्थळ २३ एप्रिलला अपडेट केलेले आहे.
कोरोना रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आपल्या जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या नेमकी किती, याची उत्सुकता सर्वांनाच असते. त्यामुळे नागरिक वर्तमानपत्र पाहतात. काहीजणांना संकेतस्थळावरही आकडेवारी मिळत असल्याने त्याचा आधार घेतात. मात्र तेथील आकडेवारी आणि इतर ठिकाणाहून मिळणारी आकडेवारी यामध्ये तफावत आहे. नागरिकांनी कोरोनाचा सामना करताना घाबरून न जाता काळजी घेऊन सामोरे जावे, असे आवाहन करत असतानाच आकडेवारीत मात्र तफावत जाणवत आहे. यामुळे सरकार खरी आकडेवारी लपवत तर नाही ना, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर प्रत्येक जिल्ह्याची आकडेवारी दिली जात आहे. यावर ‘घाबरू नका, काळजी घ्या’, असे आवाहन केले आहे. या आकडेवारीवर विश्‍वास ठेवायचा का, असा प्रश्‍न केला जात आहे. 

काही जिल्ह्यांची ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेली आकडेवारी
पुणे : ८७६, सोलापूर : ३९, ठाणे : ५४३, धुळे : १६, सातारा : २१

 

सरकारच्या https://experience.arcgis.com/experience/8167a61f882a4af4b9098e947dfd589f/ या संकेतस्थळावरील माहिती (१८.०२ वाजता घेतलेली) हे संकेतस्थळ २३ एप्रिललाच अपडेट केलेले आहे. 
पुणे : ९१०, सोलापूर : ३३, ठाणे : ५९५, धुळे : १७, सातारा : २०, मुंबई : ४२०५, पालघर : १३०, नाशिक : १२०, नागपूर : १००, औरंगाबाद : ४०, अहमदनगर : ३२, सांगली : २६, बुलडाणा : २४, अकोला २०. यामध्ये ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेली काही जिल्ह्यांची आकडेवारी व संकेतस्थळावरील आकडेवारी यामध्ये तफावत आहे. ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेली आकडेवारी अधिकाऱ्यांकडूनच आलेली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Differences in corona statistics on government websites