पाणीपुरवठा कामावरून रंगला "या' तालुक्‍यातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये वाद !

Water supply
Water supply

मरवडे (सोलापूर) : मरवडे (ता. मंगळवेढा) येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामावरून आजी-माजी पदाधिकाऱ्यांत वाद चांगलाच रंगला आहे. पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाले असून या कामाची चौकशी करावी, अशी मागणी माजी सरपंच जगन्नाथ मासाळ व सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत गणपाटील यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे, तर शासकीय नियमानुसारच पाणीपुरवठा योजनेचे काम झाले असल्याबाबत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी खुलासा करत पत्रकबाजी केली आहे. 

मरवडे येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत गावातील अंतर्गत पाइपलाइन नव्याने टाकणे, विद्युत पंप बसविणे आदी सुमारे 50 लाख रुपयांची कामे केली जात आहेत. कामे करत असताना नियमबाह्य व निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत. या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. मरवडे गावातील पाण्याची टाकी पाडण्यात आली असून, सध्याची पाण्याची टाकी नंदूर पाणीपुरवठा योजनेतील आहे. पाण्याची टाकी ग्रामपंचायतीकडे हस्तांतर करण्यात आलेली नाही व टाकी दीड लाख लिटरची असून मरवडे गावाच्या लोकसंख्येचा विचार करता दीड लाख लिटर क्षमतेच्या दोन टाक्‍यांची गरज आहे. टाकीचे काम पहिल्यांदा करावयाचे असताना घाईगडबडीत शासन नियमांना बगल देत व चुकीच्या पद्धतीची माहिती देत फक्त पाइपलाइनचे काम मंजूर करत ते सुरू करण्यात आले आहे.

शासकीय अधिकाऱ्यांचा देखरेखीविना कामे करत पाइपलाइनसाठी खोदलेली चारी अतिशय कमी खोलीची असून या कामासाठी वापरलेल्या पाइप अतिशय निकृष्ट दर्जाच्या आहेत. हे काम इस्टिमेट व प्लॅननुसार नसून चुकीचे मूल्यांकन करत आहेत, असे दिसून येत आहे. काही ठिकाणी बोगस पाइप वापरलेले आहेत व रस्त्यावरूनच कामे केली आहेत. संपूर्ण काम लॉकडाउन कालावधीत केलेले आहे. रात्री काम चालू व दिवसा बंद अशा परिस्थितीत काम करत शासनाच्या नियमांना बगल देऊन चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे. सब ठेकेदार पद्धतीने हे काम केले जात असून ठेकेदार म्हणून ग्रामपंचायत सदस्य व पाणीपुरवठा शाखा अभियंता यांनी पंढरपूर येथील ठेकेदार यांच्या नावे काम घेऊन स्वतःच कामे करीत आहेत. तरी ही कामे त्वरित बंद करून या कामाची चौकशी झाल्याशिवाय कामांची रक्कम देण्यात येऊ नये; अन्यथा प्राणांतिक उपोषण करण्याचा इशाराही माजी सरपंच जगन्नाथ मासाळ व श्रीकांत गणपाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 

पाणीपुरवठा योजनेच्या कामावरून तक्रार करण्यात आल्याने मरवडे गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायतीने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेबाबत भ्रम, दिशाभूल करणारे पत्रक प्रसिद्ध केले आहे. तक्रारी या राजकीय हेतूने केल्या जात असून, विरोधकांच्या तक्रारीतील प्रत्येक मुद्‌द्‌यावर सविस्तर भूमिका मांडण्यात आली आहे. विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा नवा पायंडा गावच्या हिताचा नाही, असे खडे बोलही सत्ताधारी मंडळीकडून विरोधकांना सुनाविण्यात येत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com