esakal | दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या मुलांची दिवाळी "स्मरण'ने केली चैतन्यदायी ! 
sakal

बोलून बातमी शोधा

Smaran

मिळेल ते काम करत, मिळेल ते खात, पोटाची खळगी भरण्याकरिता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी असं भटकंती करत रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर जेमतेम सावली मिळावी म्हणून मारलेली ताडपत्री. त्यातील छिद्रांतून चोरून आकाशाकडे पाहत निजत असलेली तान्हुली लेकरं; ज्यांना सण, उत्सव यांचा काहीही संबध नाही, दोन वेळेचं जेवण मिळवणं इतकंच उद्दिष्ट बाळगणाऱ्या समाजातील या घटकांमध्ये दिवाळीचं चैतन्यमय वातावरण निर्मितीचं कार्य "स्मरण'ने केलं आहे. 

दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या मुलांची दिवाळी "स्मरण'ने केली चैतन्यदायी ! 

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : एकीकडे दिव्यांच्या प्रकाशाने, विद्युत रोषणाईच्या झळाळीने प्रकाशमय झालेला समाज तर दुसरीकडे मिळेल ते काम करत, मिळेल ते खात, पोटाची खळगी भरण्याकरिता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी असं भटकंती करत रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर जेमतेम सावली मिळावी म्हणून मारलेली ताडपत्री. त्यातील छिद्रांतून चोरून आकाशाकडे पाहत निजत असलेली तान्हुली लेकरं; ज्यांना सण, उत्सव यांचा काहीही संबध नाही, दोन वेळेचं जेवण मिळवणं इतकंच उद्दिष्ट बाळगणाऱ्या समाजातील या घटकांमध्ये दिवाळीचं चैतन्यमय वातावरण निर्मितीचं कार्य "स्मरण'ने केलं आहे. 

मागील आठवड्यात थंडीच्या गारठ्यातून निराधारांना आधार मिळावा, या हेतूने स्मरण बहुउद्देशीय व सामाजिक संस्थेने स्वेटरचे वाटप करताना स्टेशन रोडवरील काही झोपड्यांतील लहान मुलांची अवस्था पाहून या निरागस मुलांच्या आनंदासाठी "स्मरण'ने दिवाळी या लहान मुलांच्या सोबत साजरी करायचे ठरवले व स्मरण बहुउद्देशीय व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्या मुलांसाठी नुसतेच नवीन कपडे न देता सोबतच दिवे लावून मुलांसोबत फटाक्‍यांची आतषबाजी केली व मिठाई देत त्यांच्या अंगणात आनंदाची पणती तेवत ठेवत दिवाळी साजरी केली. 

सामाजिक कार्यकर्ते जगदीश पाटील, राहुल बिराजदार, अतिष कविता लक्ष्मण, ज्ञानेश्वर गवते, लोकेंद्र प्रजापती, सम्राट कोळी, कल्याणी बिराजदार आदींनी दिवाळी साजरी करण्याकरिता परिश्रम घेतले. 

नवीन कपडे परिधान करून फटाके उडवताना त्या निरागस मुलांच्या चेहऱ्यावरील निखळ आनंदाने खऱ्या अर्थाने आमची दिवाळी साजरी झाली असे आनंदोद्‌गार संस्थेचे अध्यक्ष मंदार कुलकर्णी यांनी बोलताना सांगितले.