"तो कर्मचारी अधिकाऱ्यांना पैसे पुरवितो का?' सोलापूर "झेडपी'त प्रशासनावर हल्लाबोल 

"तो कर्मचारी अधिकाऱ्यांना पैसे पुरवितो का?' सोलापूर "झेडपी'त प्रशासनावर हल्लाबोल 

सोलापूर ः जिल्हा परिषदेमध्ये शासनाच्या नियमानुसार एक कर्मचारी एका टेबलवर तीन वर्ष व एका विभागात पाच वर्ष राहू शकतो. असे असतानाही अर्थ विभागात एक कर्मचारी गेल्या नऊ वर्षापासून कसा काय कार्यरत आहे. शासनाने घालून दिलेले नियम प्रशासनाला नाहीत का? तो कर्मचारी तुम्हाला पैसे पुरवितो का? असा सवाल जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत केला. त्यावेळी सभागृहात शांतता पसरली होती. सर्वच सदस्यांनी आज प्रशासनाचे वाभाडे काढले. 

मागील तीन-चारवेळा तहकूब झालेली सर्वसाधारण सभा आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. कोणीच कोणाचे ऐकत नसल्याचे यावेळी स्पष्ट झाले. सदस्यांनी एखादे काम सांगितले तर त्याला नियम दाखविले जातात. फाइल पुटअप करताना त्यावर काहीतरी नकारात्मक शेरा मारला जातो. पण, अधिकारी त्यांना हवे तसे कामकाज करुन घेतात. शासनाने 53 वर्षापुढील कर्मचाऱ्यांची बदली न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, जिल्हा परिषद प्रशासन त्या कर्मचाऱ्याचीही बदली करत आहे. प्रशासन प्रमुख म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी याकडे लक्ष द्यायला नको का? असा सवालही सदस्यांनी उपस्थित केला. प्रशासनाला हवी असलेली बदली अगदी अलगद होते. मात्र, सदस्यांना महत्त्व दिले जात नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले. सदस्यांनी सांगितलेले काहीच ऐकत नाहीत, सदस्यांना काय मूर्ख समजता काय? असा सवालही श्री. पाटील यांनी उपस्थित केला. एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल असतानाही त्याला कामावर घेतले जाते. त्या अधिकाऱ्याला पाठिशी घालण्याचे काम जिल्हा आरोग्य अधिकारी करतात. त्यामुळे त्यांची पेन्शन थांबवा, असेही त्यांनी सांगितले. एकाच कर्मचाऱ्याला नऊ वर्ष एकाच ठिकाणी ठेवणे हे नियमाला धरुन आहे का? असा सवाल पाटील यांनी प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत यांना विचारला त्यावेळी राऊत यांनी "नाही' असे उत्तर दिले. मगष असे का होते. तो तुम्हाला पैसे पुरवितो का? असा सवाल पाटील यांनी केला. जवळा येथील एका कंत्राटी ड्रायव्हरला तो मद्यपान करत असताना त्याला सेवेत ठेवले जाते. एवढा अट्टहास कशासाठी. तो जर मद्यपान करणारा नसेल तर मी जिल्हा परिषद सदस्याचा राजीनामा देतो असेही श्री. पाटील यांनी सभागृहात सांगितले. 

कर्मचाऱ्यांबद्दल दुजाभावाची वागणूक 
जिल्हा परिषद प्रशासन निलंबीत कर्मचाऱ्यांबद्दल आकसाची भावना ठेऊन काम करत असल्याचा आरोप सदस्य मल्लिकार्जून पाटील यांनी उपस्थित केला. अनेक कर्मचाऱ्यांना निलंबीत केले आहे. पण, त्यांना पुन्हा सेवेत घेतले जात नाही. अनेक कर्मचाऱ्यांची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यांच्या निलंबनाचे प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आले आहेत. मात्र, त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाहीत. ग्रामसेवक गटविकास अधिकाऱ्यांनाच कारवाईची धमकी देतो असे सदस्य वसंत देशमुख यांनी सभागृहात सांगितले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासनात नेमके काय चालले आहे? असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. 

पंचायत समितीच्या निर्णयाला ठेंगा 
दक्षिण सोलापूर पंचायत समितीने एका कर्मचाऱ्याच्या बदलीचा ठराव झाला आहे. सर्व सदस्यांनी येऊन अधिकाऱ्यांना तसे सांगितले आहे. मात्र, अद्यापही त्याची बदली झाली नाही. पंचायत समितीने केलेल्या ठरावाला ठेंगा दाखविण्याचे काम प्रशासन करत आहे. ग्रामसेवकांना भ्रष्टाचार प्रकरणी निलंबित करण्याची कारवाई केली आहे का? केली असेल तर किती जणांवर केली. त्यांनी किती रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे ही सगळी माहिती सदस्यांना देण्याची मागणी वसंत देशमुख यांनी केली. 



 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com