"या' तालुक्‍यात लॉकडाउनला विरोध, नियमांचा फज्जा ! कसा रोखणार कोरोना? 

Corona
Corona

सांगोला (सोलापूर) : सांगोल्यातील जनता कर्फ्यूला एकीकडे बहुतांश व्यापाऱ्यांचा विरोध होताना दिसतोय तर दुसरीकडे अनेक नागरिकांसह ग्राहक व दुकानदारच शासनाच्या नियमांची पायमल्ली करताना दिसतात. ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंगचे पालन, अशाने कसा रोखेल सांगोल्यातील कोरोना, असा असा प्रश्न सुजाण नागरिक करत आहेत. हजाराच्या टप्प्यात आलेल्या कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता प्रशासनाने आता नियम तोडणाऱ्यांवर कडक कायवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

सांगोला शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व सूचनांचे नागरिकांसह ग्राहक व व्यापाऱ्यांकडून उल्लंघन केले जात आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अनेकजण फक्त प्रशासनाकडे बोट दाखवत आहेत; प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करताना करताना मात्र कोणी दिसत नाही. आमदार शहाजी पाटील यांनी जनता कर्फ्यूबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये अनेक व्यापाऱ्यांनी जनता कर्फ्यूला उघडपणे विरोध दर्शवला होता. त्यामुळे जनता कर्फ्यूबाबत निर्णय या बैठकीत लागला नाही. सुजाण नागरिक मात्र कोरोनाची शहरातील साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यू लागू करावा, अशी मागणी करीत आहेत. 

सध्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने याचा परिणाम आपोआपच काही दिवसांनी ग्रामीण भागावरही जाणवणार आहे. शहरासह तालुक्‍यातील ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांसाठी कोविड सेंटरही अपुरे पडू लागले आहेत. तालुक्‍यात मंगळवारी रात्रीपर्यंत (ता. 8) 858 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. 441 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. कोविड सेंटरवरील सुविधांबाबत नागरिकांमध्ये प्रमाणात तक्रारी होत आहेत. तसेच ग्रामीण भागामध्ये अनेक गैरसमज पसरले असल्याने ग्रामीण भागातील नागरिक कोरोना चाचणीसाठी टाळाटाळ करताना दिसून येत आहेत. याबाबत प्रशासनाकडून या गैरसमजाबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. सर्वच विभागातील प्रशासनाकडूनही बघ्याची भूमिका न ठेवता कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. 

सांगोल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे म्हणाले, शहरामध्ये लक्षणे नसणाऱ्या कोरोनाबधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. यामध्ये व्यापारी मोठ्या प्रमाणावर असल्याने ही चिंतेची बाब आहे. नागरिकांनी वेळीच सावध होऊन सुरक्षित अंतर पाळावे व मास्कचा वापर करून स्वतःला सुरक्षित ठेवावे. पुढील 15 दिवस निर्णायक असून नागरिक व व्यापाऱ्यांनी जबाबदारीने वागून नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे. नियमांची पायमल्ली करणाऱ्या बेफिकीर व्यापाऱ्यांवर यापुढे पाच हजार रुपये दंड, दुकान 15 दिवसांकरिता सील करणे यासारखी कठोर कारवाई केली जाईल. 

मंगळवेढाचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले म्हणाले, सांगोला शहर व तालुक्‍यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन सर्वांनी शासनाने दिलेल्या नियमांची अंमलबजावणी केली पाहिजे. प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतल्यास आपल्या कुटुंबाची, आपल्या गावाची व सर्वांची काळजी घेतल्यासारखी आहे. कोरोनाबाबत कोणत्याही अफवांवर नागरिकांनी दुर्लक्ष करावे व चाचणीसाठी पुढे आले पाहिजे. नागरिकांनी वेळीच कोरोना चाचणी करून घेतल्यास पुढील संसर्ग टाळता येईल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com