अखेर कोरोनाने एंट्री केलेल्या "या' तालुक्‍यातील ग्रामपंचायती स्वच्छतेबाबत उदासीन; नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात! 

Garbage
Garbage

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍याबाहेर असणारा कोरोना अखेर तालुक्‍यात येऊन धडकल्यामुळे पालिकेने शहरात फवारणी केली आहे. परंतु, तालुक्‍याबाहेर असलेल्या ग्रामपंचायतीची उदासीन भूमिका दिसू लागल्याची ओरड नागरिकांतून होऊ लागली आहे. सध्या शहराबरोबर ग्रामीण भागात निंबोणी, खवे, बोराळे, कचरेवाडी, सोड्डी येथे रुग्ण सापडल्यामुळे आता ग्रामपंचायतीने देखील सतर्क राहणे आवश्‍यक आहे. 

शहरातील दत्तू गुंगे गल्लीमधील एका नागरिकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या व्यक्तीच्या संपर्कातील 35 जणांना येथील कोव्हिड केअरट सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर 84 लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढू नये याकरिता शहरातील गुंगे गल्ली, नगरपरिषद हद्द परिसर, शहरालगतचा ग्रामीण परिसर आणि संत दामाजीनगर ग्रामपंचायत हद्द परिसर तसेच संत चोखामेळानगर ग्रामपंचायत हद्द परिसर व आजूबाजूच्या एक किलोमीटर पर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र तसेच या प्रतिबंधित क्षेत्रापासून तीन किमीपर्यंतचा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. 

अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद असून, गेल्या तीन महिन्यांत बेफाम झालेले नागरिक आता सतर्क झाले आहेत. पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडाची कारवाई केली. नगरपालिकेच्या वतीने या क्षेत्रामध्ये तातडीने फवारणी करून हा परिसर स्वच्छ करण्यात आला. दरम्यान, शहराच्या परिसरामध्ये दोन ग्रामपंचायतींनी देखील खबरदारीचा उपाय म्हणून फवारणी करणे अपेक्षित आहे. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये फवारणी होत नसल्यामुळेच या ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आल्याची ओरड नागरिकांतून होत आहे. उच्चशिक्षित व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या या दोन ग्रामपंचायतींमधील मिळकतदारांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. 

चोखामेळा नगरचे ग्रामस्थ रमेश शिंदे म्हणतात, शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे ग्रामपंचायतीने सतर्क राहून औषध फवारणी व स्वच्छतेची दखल घेणे आवश्‍यक आहे. परंतु या बाबीकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. 

प्रशासनाधिकारी रोहिणी गायगोपाळ म्हणाल्या, कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर नगरपालिकेच्या वतीने परिसरात स्वच्छता व फवारणी करून पालिकेच्या वतीने उर्वरित परिसरामध्ये देखील स्वच्छता व फवारणी करण्यासाठी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com