सर्व्हर डाउनमुळे मिळेनात सात-बारा उतारे; गैरसमजातून होत आहेत तलाठी विरुद्ध शेतकरी वाद !

राजकुमार शहा 
Wednesday, 28 October 2020

अतिवृष्टी व महापुरामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांपुढे आता नवीनच समस्या उभी राहिली आहे. गेल्या आठवडाभरापासून सर्व्हर डाउन झाल्यामुळे शेतकऱ्यांना सात-बाराचे उतारे मिळविण्यात अडचणी येत आहेत. परिणामी तलाठी व शेतकरी यांच्यात संघर्ष होत आहेत. 

मोहोळ (सोलापूर) : अतिवृष्टी व महापुरामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांपुढे आता नवीनच समस्या उभी राहिली आहे. गेल्या आठवडाभरापासून सर्व्हर डाउन झाल्यामुळे शेतकऱ्यांना सात-बाराचे उतारे मिळविण्यात अडचणी येत आहेत. परिणामी तलाठी व शेतकरी यांच्यात संघर्ष होत आहेत. 

सध्या मोहोळ तालुक्‍यात पुराच्या पाण्याने व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व घरांचे मोठे नुकसान झाले आहे. खासगी व विविध बॅंकांच्या कामासाठी शेतकऱ्यांना सात-बारा उतारा लागतो. गेल्या सुमारे आठवड्यापासून सर्व्हर डाउन असल्याने संगणक सुरू केल्यास इंटरनेटचा वेग अत्यंत कमी आहे. तर वेबसाइट ओपन होत नाही. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींची खरेदी - विक्री झाली आहे, त्यांच्या नोंदीही धरता व मंजूर करता येत नाहीत. 

अपवाद वगळता ग्रामीण भागातील शेतकरी अडाणी आहे. त्याला संगणक प्रणालीची माहिती नाही. त्यामुळे तलाठी आपल्याला मुद्दाम उतारा देत नाही, अशा गैरसमजातून शेतकरी व तलाठी यांच्यात हमरीतुमरी सुरू होत आहे. त्यामुळे परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत यावर तातडीने मार्ग काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. दरम्यान, या संदर्भात ऑनलाइन सात- बाराचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांच्याशी संवाद साधला असता, दुपारी 12 ते तीन या वेळेत इंटरनेटचा वेग मंदावलेला असतो, इतरवेळी वेग असतो, असे त्यांनी सांगितले. मात्र ग्रामीण भागातील परिस्थिती वेगळी आहे. दिवसभर जरी शेतकरी कार्यालयात बसून राहिला तरीही त्याला उतारा मिळेल की नाही, हे सांगता येत नाही. 

शेतकरी मधुकर भोसले म्हणाले, मी एक आठवडा झाला तलाठ्याकडे उताऱ्याची मागणी केली आहे. मला उतारा मिळाला नाही. तलाठ्याने माझ्यासमोर वेबसाइट ओपन केली मात्र केवळ गोल चक्र फिरताना दिसत आहे. माझे बॅंकेचे काम आहे. सर्व कागदपत्रे गोळा झाली आहेत, सात - बारामुळे माझे काम थांबले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to server down, farmers do not get saat-bara transcripts