सोलापुरातील आसरा पुलावर धुळीचे लोट

श्‍याम जोशी 
Sunday, 18 October 2020

सुमारे 20 वर्षापूर्वीच्या आसरा पुलाच्या रूंदीकरणासाठी तातडीने निधी द्यावा तसेच जुळे सोलापूरातील विविध समस्या सोडवाव्यात अशा मागण्यांचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांना देण्यात आले. 

 सोलापूर ः आसरा रेल्वे पुलावर पडलेल्या खड्यांना बुजवण्यासाठी महापालिका प्रशासनाने पहिल्यांदा खडीमिश्रित डांबर टाकले ते वाहून गेल्याने चक्क मुरूमच टाकला. मुरूमात दगड कमी अन्‌ माती अधिक असल्याने पुलावर नुसते धुळीचे लोट उठत आहेत. वाहनधारकांसह परिसरातील दुकानदार व रहिवाशी वैतागले आहेत. 
धर्मवरी संभाजी तलावाजवळील रेल्वे पुलाखालून ड्रेनेजच्या पाईपलाईनचे काम करण्यासाठी तेथील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्या मार्गावरून विजापूरला जाणारी जड व अन्य वाहतूक आसरा पुलावरून सुरू आहे. या पुलाची क्षमता पाहता ही जड वाहतूक या पुलाला पेलवणार आहे की नाही याचाही विचार प्रशासनाने केल्याचे दिसत नाही. याशिवाय आसरा पुलावर रस्त्याच्या खड्यांची डागडूजीही केली नाही. वाहतूक सुरू झाल्यानंतर माध्यमांनी ओरड करताच महापालिकेला जाग आली. त्यांनी लगबगीने खडीमिश्रित डांबर वापरून हे खड्डे बुजवले परंतु दुसऱ्याच दिवशी पावसामुळे ते डांबर वाहून गेल्याने पुन्हा खड्डे उघडे पडले. मग महापालिका प्रशासनाने चक्क मुरूमाने खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला. काही खड्डे बुजले तर काही तसेच होते. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना अडथळ्याची शर्यत करावी लागत आहे. टाकलेल्या मुरूमातही माती अधिक असल्याने पुलावर धुळीचे लोट उठत आहेत. एखादे मोठे वाहन जाताना मोठ्या प्रमाणात उठलेल्या धुळीच्या लोटामुळे समोरचे काहीच दिसत नाही. त्यामुळे दुचाकी धारकांना वाहन चालवताना त्रास होत आहे. परिसरातील दुकानातूनही ही धुळ जात असल्याने दुकानदारासह ग्राहक वैतागून गेले आहेत. सोलापूर शहरात महापालिका आहे का ग्रामपंचायत असा संतप्त सवाल नागरिकातून व्यक्त होत आहे. कर आकारणी महापालिका नियमानुसार अन्‌ सुविधा मात्र ग्रामपंचायतीच्या सुध्दा नाहीत अशी स्थिती सध्या सोलापूरात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. आसरा पुलावरून सध्या वाहतूक वाढल्याने येथील खड्डे बुजवताना ते व्यवस्थित काम झाले पाहिजे याकडे प्रशानातील अधिकारी किंवा नगरसेवकांचे अजिबात लक्ष नसल्याचे यावरून दिसत आहे. खड्डे बुजवण्यासाठी असा दोन दोन वेळा खर्च करण्यापेक्षा एकदाच चांगल्या पध्दतीने काम केल्यास येथील समस्या सुटण्यास मदत होणार असल्याने दर्जेदार व उत्तम काम होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. 

संभाजी ब्रिगेडचे खासदारांना निवेदन 

सुमारे 20 वर्षापूर्वीच्या आसरा पुलाच्या रूंदीकरणासाठी तातडीने निधी द्यावा तसेच जुळे सोलापूरातील विविध समस्या सोडवाव्यात अशा मागण्यांचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांना देण्यात आले. 
शहराध्यक्ष श्‍याम कदम यांनी हे निवेदन दिले आहे. सोलापूर शहराची हद्दवाढ झाल्यानंतर जुळे सोलापूर परिसरात वसाहतींची झपाट्याने वाढ झाली. या परिसरातून शहराला जोडणारा आसरा येथील रेल्वे पूल सुमारे 20 वर्षापूर्वी बांधलेला आहे. सध्याची त्यावरील वाहतूक पाहता त्याचे रूंदीकरण अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे खासदार डॉ जयसिध्देश्‍वर महास्वामी यांनी महापालिका आयुक्त, महापौर, रेल्वे प्रशासन यांची एकत्रित बैठक घेण्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच कल्याण नगरातील रस्त्यांसाठी विशेष निधी द्यावा, गुंठेवारी क्षेत्रात महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळावी, ड्रेनेज लाईनचे काम व्हावे, सखल भागात घरातून पावसाचे पाणी शिरणार नाही याची दक्षता महापालिकने घेण्याची सूचना द्यावी, छत्रपती संभाजाराजे तलावालगत सुशोभिकराणाद्वारे पर्यटनस्थळ विकसीत करण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी आणावा असेही निवेदनात म्हटले आहे. 

संपादन : अरविंद मोटे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dust on the Asara bridge in Solapur