तीस अन्‌ तीन दांपत्यांसाठी "इको फ्रेंडली' दान  सोलापूरातील देशपांडे परिवाराचा उपक्रम ः वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

श्‍याम जोशी 
Tuesday, 29 September 2020

देना बॅंकेचे निवृत्त मुख्य व्यवस्थापक सुनिल देशपांडे यांनी सांगितले की, वृक्षलागवड व संवर्धनाचे महत्त्व वाढावे यासाठी हा प्रयत्न केला. यानिमित्ताने सर्वांपर्यंत वृक्षलागवडीसह वृक्षसंवर्धनाचा संदेश देता आला. तुळस कायम ऑक्‍सिजन देणारी असल्याने त्या रोपांचे वाटप केले.

 दक्षिण सोलापूर ः जुळे सोलापूरच्या बॅंक कॉलनीतील सेवानिवृत्त बॅंक व्यवस्थापक सुनिल देशपांडे व सुप्रिया देशपांडे यांनी यंदाच्या अधिकमासानिमित्त तीस अन्‌ तीन दांपत्यांना "इको फ्रेंडली'दान उपक्रमातून तुळशीच्या रोपांचे दान केले. 
सध्या अधिकमास सुरू असल्याने घरोघरी जावई व आप्तेष्टांना तीस अन्‌ तीन अनारशांचे दान दिले जात आहे. या महिन्यात तेहतीस वस्तू दान देणे व तेहतीस दांपत्यांना भोजन देण्याचा प्रघात आहे. अनेक ठिकाणी तीस अन्‌ तीन दांपत्यांना भोजनासह विविध साहित्याचे दान दिले जात आहे. या पारंपारिकतेला नाविन्याची जोड देत जुळे सोलापूरच्या बॅंक कॉलनीतील रहिवाशी व देना बॅंकेचे निवृत्त व्यवस्थापक सुनिल देशपांडे यांनी पत्नी सुप्रियाच्या सहाय्याने यंदा "इको फ्रेंडली' दान देण्याचा उपक्रम राबविला. 
श्री. देशपांडे यांनी या उपक्रमासाठी एक महिन्यापासूनच तयारी सुरू केली होती. सौ. देशपांडे यांनी सुमारे चाळीस पिशव्यातून माती भरून ही रोपे त्यामध्ये लावून घेतली. घराच्या बागेतच तुळशीची रोपे तयार करून ठेवली. कार्यक्रमाच्यावेळी श्री व सौ.देशपांडे यांनी तीस अन्‌ तीन दांपत्यांना भोजनासह तुळशीच्या रोपांचे दान केले. यावेळी त्यांनी सर्व दांपत्यांची पाद्यपूजा करून त्यांना तांब्याचे ताम्हण, तांब्याचे दिवे व वस्त्रदानही केले. मरिन इंजिनियर असलेला त्यांचा मुलगा सौरभ व त्याची पत्नी श्रध्दा या दोघांचेही या कर्यक्रमासाठी सहकार्य मिळाले. देशपांडे परिवाराने राबवलेल्या या "इको फ्रेंडली' दान उपक्रमाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. 
देना बॅंकेचे निवृत्त मुख्य व्यवस्थापक सुनिल देशपांडे यांनी सांगितले की, वृक्षलागवड व संवर्धनाचे महत्त्व वाढावे यासाठी हा प्रयत्न केला. यानिमित्ताने सर्वांपर्यंत वृक्षलागवडीसह वृक्षसंवर्धनाचा संदेश देता आला. तुळस कायम ऑक्‍सिजन देणारी असल्याने त्या रोपांचे वाटप केले. 

संपादन : अरविंद मोटे 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Eco Friendly" donation for thirty and three couples