
कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून त्या - त्या भागातील कीर्तनकारांना व्यासपीठ उपलब्ध होईल आणि त्यांची कीर्तने, प्रवचने लोकांना घरबसल्या ऐकता येतील. धार्मिक कार्यक्रमांबरोबरच शेती, आरोग्य, महिला सबलीकरण या विषयीचे मार्गदर्शन देखील त्या माध्यमातून करता येईल, असा या योजनेचा हेतू आहे.
पंढरपूर (सोलापूर) : संत वाङ्मयाचा प्रसार व्हावा, गावोगावच्या कीर्तनकारांना व्यासपीठ मिळावे, धार्मिक कार्यक्रम त्या- त्या भागातील लोकांना घरबसल्या ऐकू यावेत यासाठी "संतवाणी' या नावाने कम्युनिटी रेडिओ सुरू करण्याच्या दृष्टीने हलचाली सुरू आहेत. पंढरपूरसह आळंदी, देहू, सासवड, त्र्यंबकेश्वर, पैठण आणि मुक्ताईनगर अशा सात ठिकाणांहून कार्यक्रम प्रसारित करण्याची कल्पना आहे. संबंधितांशी चर्चा करून कार्यवाही कशा पद्धतीने करायची, याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.
श्री. औसेकर महाराज म्हणाले, कोल्हापूर येथील धैयशील पाटील यांची ही कल्पना त्यांनी आमच्यासमोर मांडली. प्रमुख संतांच्या वाङ्मयांची लोकांना माहिती आहे, परंतु अनेक संतांच्या विषयीची पाहिजे तेवढी माहिती लोकांना अजून नाही. पंढरपूरसह प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम वर्षभर सुरू असतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रम सातत्याने सुरू असतात. कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून त्या - त्या भागातील कीर्तनकारांना व्यासपीठ उपलब्ध होईल आणि त्यांची कीर्तने, प्रवचने लोकांना घरबसल्या ऐकता येतील. धार्मिक कार्यक्रमांबरोबरच शेती, आरोग्य, महिला सबलीकरण या विषयीचे मार्गदर्शन देखील त्या माध्यमातून करता येईल, असा या योजनेचा हेतू आहे. राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून त्यासाठी आवश्यक निधी आणि अन्य मदत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.
यासंदर्भात टेक्निकल सल्ला देत असलेले कोल्हापूर येथील धैर्यशील पाटील "सकाळ'शी बोलताना म्हणाले, आपापल्या गावातील स्थानिक टिव्ही चॅनेल लोक जसे स्थानिक बातम्यांसाठी पहातात, त्या पद्धतीने पंढरपूर आणि अन्य संतांच्या संस्थानच्या परिसरातील लोक कम्युनिटी रेडिओ आवडीने ऐकतील. या संदर्भात आपण पंढरपूरबरोबरच सातही संस्थांनांशी संपर्क साधला आहे. त्यापैकी आळंदी, त्र्यंबकेश्वर, मुक्ताईनगर, सासवड आणि पैठण या संस्थानांनी प्राथमिक सहमती दर्शवली आहे. सुमारे वीस ते पंचवीस किलोमीटर एरियल डिस्टन्समध्ये त्या - त्या सेंटरचे कार्यक्रम लोकांना ऐकू येतील. सर्व सात सेंटर सुरू करण्यासाठी सुमारे 9 ते 10 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
संतवाणी कम्युनिटी रेडिओबरोबरच त्या नावाचे ऍप तयार करण्याचाही आमचा मानस आहे. त्या माध्यमातून प्रमुख तीर्थक्षेत्रांची माहिती, त्या ठिकाणी असलेल्या सोयीसुविधा, दळणवळण आदी माहिती देण्याचा प्रयत्न राहणार आहे.
या संदर्भातील प्राथमिक चर्चा मंदिर समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत झाली. लवकरच संबंधित संस्थानच्या पदाधिकाऱ्यांची श्री. औसेकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर येथे बैठक आयोजित केली जाईल व त्यानंतर न्याय व विधी विभागाकडे याविषयीचा प्रस्ताव पाठवला जाईल.
- विठ्ठल तथा सुनील जोशी,
कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर
निधी मिळाल्यास यशस्वी होईल संकल्पना
कृषी सल्ला, हवामान अंदाज, शासकीय सूचना व आवाहने, धरणातील पाणीसाठा, नैसर्गिक आपत्ती अशी उपयुक्त माहिती या कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून लोकांना मिळाली तर त्याला मोठा प्रतिसाद मिळेल. कृषी विभागाकडील योजना आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थेतील निधीतून काही रक्कम त्या - त्या संस्थानांना कम्युनिटी रेडिओसाठी दिली गेल्यास ही संकल्पना यशस्वी आणि बहुपयोगी ठरेल.
संपादन : श्रीनिवास दुध्याल