
राज्य शासनाचे व विविध संस्थांचे पुरस्कार पटकावलेल्या मळेगाव ग्रामपंचायतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र ग्रामपंचायतीच्या नऊ जागेसाठी अनेकांचे उमेदवारी अर्ज कायम राहिल्याने 45 वर्षांनंतर मळेगाव येथे निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.
मळेगाव (सोलापूर) : सलग नऊ वेळा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून विक्रम केलेल्या मळेगाव ग्रामपंचायतीसाठी शेवटच्या दिवशीही उमेदवारी अर्ज कायम राहिल्याने मळेगावची बिनविरोधची परंपरा खंडित झाली आहे. त्यामुळे बिनविरोध ग्रामपंचायतीचे अर्धशतक पूर्ण होण्याचं स्वप्न अधुरे राहिले.
राज्य शासनाचे व विविध संस्थांचे पुरस्कार पटकावलेल्या मळेगाव ग्रामपंचायतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र ग्रामपंचायतीच्या नऊ जागेसाठी अनेकांचे उमेदवारी अर्ज कायम राहिल्याने 45 वर्षांनंतर मळेगाव येथे निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मात्र, मळेगाव परिसरातील पिंपळगाव (पान), जामगाव (पा), हळदुगे येथील निवडणूक बिनविरोध झाली आहे. हिंगणी (पा) येथील चार जागा बिनविरोध झाल्या असून तीन जागांसाठी निवडणूक लागली आहे. गौडगाव येथील 9 जागा बिनविरोध झाल्या असून दोन जागांसाठी निवडणूक लागली आहे.
राज्यात सुरू असलेल कोरोनाचे संकट, ढासळलेली अर्थव्यवस्था यामुळे सध्याचा निवडणुकीचा खर्च न परवडणारा असल्याने अनेक ग्रामपंचायतींनी बिनविरोधचा आदर्श मार्ग निवडला. शासन, लोकप्रतिनिधी, संस्था, समाजातील दानशूर मंडळींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपळगाव, जामगाव, हळदुगे, खामगाव, रातंजन येथील ग्रामपंचायती बिनविरोध करून गावच्या सर्वांगीण विकासासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.
बार्शी तालुक्यात संवेदनशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या पिंपळगाव (पा)ने 40 वर्षांनंतर प्रथमच ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्याने गावात एक वेगळाच उत्साह संचारला आहे. जामगाव (पा) ग्रामस्थांनी देखील बिनविरोध ग्रामपंचायत करण्याची परंपरा कायम राखत याही वर्षी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या हळदुगे ग्रामस्थांनी गावच्या एकीचे दर्शन दाखवत गावची निवडणूक बिनविरोध करत एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.
रातंजन नवनिर्वाचित सदस्य
रातंजन (ता. बार्शी) येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली असून माजी सरपंच प्रा. साहेबराव देशमुख गटाचे 5 व किसन हजारे व अजित कवठेकर गटाचे 4 सदस्य बिनविरोध निवडण्यात आले. नवनिर्वाचित सदस्य पुढीलप्रमाणे : प्रभाग क्रमांक - एक : रंजना मधुकर तिसरबूडे, रेश्मा शहाजी देशमुख, तोलामा शब्बीर अत्तार. प्रभाग क्रमांक - 2 : रामराजे व्यंकटराव देशमुख, सचिन केरबा चव्हाण, चित्रा अजित कवठेकर. प्रभाग क्रमांक - 3 : परमेश्वर मारुती बिले, राणी मधुकर काटकर, स्नेहा नेताजी हजारे. ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी निशिकांत देशमुख, महादेव काटकर, अलिमोद्दीन काझी, संभाजी देशमुख, विश्वजित देशमुख, विशाल पवार, विजय पवार, बबन पाटील, महावीर हजारे, राजेंद्र हजारे, बाळासाहेब नागटिळक, अशोक नागटिळक, उद्धव काटे आदींनी पुढाकार घेतला.
संपादन : श्रीनिवास दुध्याल