सांगोल्यातील 61 "मिनी मंत्रालयां'च्या निवडणूक मोर्चेबांधणीला येतोय वेग !

दत्तात्रय खंडागळे 
Friday, 6 November 2020

सांगोला तालुक्‍यातील मुदत संपणाऱ्या 61 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. "मिनी मंत्रालय' म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी गावपातळीवरील स्थानिक पुढाऱ्यांपासून विविध पक्षांचे वरिष्ठ नेतेमंडळी गावावर कब्जा मिळवण्यासाठी कामाला लागले आहेत. 

सांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यातील मुदत संपणाऱ्या 61 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. "मिनी मंत्रालय' म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी गावपातळीवरील स्थानिक पुढाऱ्यांपासून विविध पक्षांचे वरिष्ठ नेतेमंडळी गावावर कब्जा मिळवण्यासाठी कामाला लागले आहेत. या निवडणुकांसाठी अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्याने मिनी मंत्रालयाच्या निवडणुकांमुळे गाव पातळीवरील पक्षीय युती, आघाड्या व पॅनेल बनवण्यासाठी राजकारण ढवळून निघण्यास सुरवात होणार आहे. 

राज्य सरकारने कोरोना महामारीमुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करून निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. सध्या ग्रामपंचायतीचा प्रभाग रचना आराखडा पूर्ण झाल्याने या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. सांगोला तालुक्‍यात 61 ग्रामपंचायतींची मुदत जुलैमध्ये संपली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलून गाव कारभार प्रशासकाच्या हाती दिला होता. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्याने दिवाळीनंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे फटाके फुटले जाण्याची शक्‍यता आहे. 

डिसेंबर महिन्यात 45 ग्रामपंचायतींची मुदत संपणार असल्याने एकूण 61 ग्रामपंचायतींच्या निवडणुका एकत्रितच होतील. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीची निवडणूक रणधुमाळी सुरू होणार आहे. तालुक्‍यातील 76 ग्रामपंचायतींपैकी 61 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल पुन्हा वाजणार असल्याने आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची पूर्वतयारी या निवडणुकांमधून होणार आहे. 

तालुक्‍यात विधानसभेच्या निवडणुकीवेळी शेतकरी कामगार पक्षाच्या विरोधात इतर विविध पक्ष एकत्रित आले होते. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पक्षीय राजकारणाबरोबरच प्रभाग रचनेनुसार भाव-भावकी, स्थानिक पक्षविरहित आघाड्या, जातीच्या समीकरणानुसार आघाड्या-युत्या केल्या जातात. परंतु सध्या तालुक्‍यातील विधानसभेच्या निवडणुकांपासून राजकारणाला वेगळी दिशा मिळाल्याने तालुका स्तरावरील नेते मंडळींप्रमाणे स्थानिक गाव पुढारीही एकत्रित येतील का, याकडेच लक्ष लागले आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत कोणत्या पक्षाच्या आघाड्या होणार, याचा अंदाज बांधणे सध्या तरी कठीण वाटत असले तरी गावपातळीवरील स्थानिक राजकारणाचा प्रभाव अधिक दिसून येत असतो. 

ग्रामपंचायतीचा प्रभाग रचना आराखडा पूर्ण झाला असला तरी सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सरपंचपदाच्या सोडतीनंतर खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग येणार आहे. सध्या तरी प्रभाग रचनेनुसार होणाऱ्या आरक्षणाप्रमाणेच निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. 

सांगोला तालुक्‍यातील आलेगाव, आगलावेवाडी, बामणी, चोपडी, देवळे, एखतपूर, गायगव्हाण, हलदहिवडी, महीम, मेडशिंगी, नाझरे, निजामपूर, संगेवाडी, सोमेवाडी, तरंगेवाडी, वासूद या 16 ग्रामपंचायतींची मुदत जुलै महिन्यात संपली आहे. तर डिसेंबर महिन्यात अचकदाणी, बुरंगेवाडी, भोपसेवाडी, डिकसळ, डोंगरगाव, धायटी, कमलापूर, खिलारवाडी, मांजरी, शिरभावी, वझरे, वाटंबरे, अजनाळे, बुद्धेहाळ, हणमंतगाव, इटकी, हंगिरगे, जुनोनी, जुजारपूर, लोणविरे, मानेगाव, मेथवडे, वाणीचिंचाळे, वाकी-घेरडी, अकोला, गौडवाडी, हातीद, हटकर मंगेवाडी, जवळा, कटफळ, महूद, पाचेगाव बु, राजुरी, तिप्पेहाळी, उदनवाडी, वाकी-शिवणे, घेरडी, कडलास, किडबिसरी, कोळे, लक्ष्मीनगर, लोटेवाडी, नराळे, पारे, य. मंगेवाडी या 45 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. 

विधानसभेप्रमाणे गावपातळीवर युती होणार का? 
विधानसभा निवडणुकीवेळी तालुक्‍यातील मातब्बर नेतेमंडळी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात एकत्रित आले होते. या निवडणुकीप्रमाणे गावपातळीवर सुद्धा आगामी ग्रामपंचायत निवडणुकांत आघाड्या होणार का? पक्षीय राजकारणाला नवी दिशा मिळणार का? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election preparations for 61 Gram Panchayats in Sangola are in full swing