esakal | व्यापारी पाहताहेत ग्राहकांची वाट, पण ऐन दिवाळीतही बाजारपेठ सामसूम ! 
sakal

बोलून बातमी शोधा

Mangalwedha market

गेल्या सात महिन्यांपासून तालुक्‍यावर घोंघावलेल्या कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे नागरिक आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे तालुक्‍यात यंदाची दिवाळी देखील इतर सणांप्रमाणे सामसूम अवस्थेत साजरी करण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठेवर मोठा परिणाम दिसून येत आहे. 

व्यापारी पाहताहेत ग्राहकांची वाट, पण ऐन दिवाळीतही बाजारपेठ सामसूम ! 

sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : गेल्या सात महिन्यांपासून तालुक्‍यावर घोंघावलेल्या कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे नागरिक आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे तालुक्‍यात यंदाची दिवाळी देखील इतर सणांप्रमाणे सामसूम अवस्थेत साजरी करण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठेवर मोठा परिणाम दिसून येत आहे. 

मार्च महिन्यापासून लॉकडाउन जाहीर केल्यानंतर बाहेरगावी रोजगारासाठी गेलेले नागरिक आपापल्या गावी परतले आहेत. सुरवातीच्या दोन महिन्यांत त्यांच्याजवळ असलेली शिल्लक रक्कम संपल्यामुळे कसेबसे हातावर पोट असणारे मजूर उपलब्ध पैशावर आपापला घरखर्च भागवू लागले. काही नागरिकांनी आपल्या हौसेला मुरड घातली. अशा परिस्थितीत याचा परिणाम जून महिन्यात झालेल्या कारहुणवी, त्यानंतर रमजान ईद, गणेशोत्सव, बकरी ईद, दसरा आदी सण देखील तालुक्‍यामध्ये अतिशय साध्या पद्धतीने साजरे केले गेले. त्यामुळे नागरिक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले. 

काही बॅंकांकडून शेतकऱ्यांना कर्ज देताना टाळाटाळ झाल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला देखील सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीत हाती आलेले खरिपाचे पीक अतिवृष्टीने जमीनदोस्त झाले. शेतकऱ्यांना नेमके किती अनुदान द्यायचे, या संभ्रमामुळे अखेर 19 कोटी 98 लाखांचे अनुदान तहसील कार्यालयामार्फत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करण्यात आले. परंतु सलग तीन दिवस बॅंकेला सुटी असल्यामुळे हे अनुदान बॅंकेतच अडकून पडले आहे. त्यामुळे अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना देखील यंदाची दिवाळी साजरी करता आली नाही. याचा परिणाम बाजारपेठेवर मोठा दिसून आला. 

दिवाळीत कोरोनाचा प्रभाव कमी होईल, या आशेवर चांगल्या व्यवसायाच्या प्रतीक्षेत असलेल्या व्यापाऱ्यांनी दिवाळीसाठी मोठ्या प्रमाणात साहित्याची खरेदी करून दुकाने भरली आहेत. परंतु शेतकऱ्याकडे पैसे उपलब्ध झाले नसल्यामुळे अनेकांनी दुकानदारांकडे पाठ फिरवली. त्यामध्ये बहुतांश ग्रामीण नागरिकांनी तयार फराळाला पसंती दिल्यामुळे फराळ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करून फराळ करण्याकडे बहुतांश नागरिकांनी पाठ फिरवली. 

कोरोना प्रादुर्भावाचा फटका मोठ्या व्यवसायांना बसला आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे किराणा व्यवसायासाठी ग्राहक मिळाला नाही. व्यवसायासाठी केलेली गुंतवणूक आणि जागेचे भाडे याचा विचार करता या वर्षीचा व्यवसाय तोट्यात करावा लागला. 
- विजय गायकवाड,
किराणा व्यावसायिक, मंगळवेढा 

गतवर्षीच्या दिवाळी सणात दररोज सलग चार दिवस चांगला व्यवसाय व्हायचा. परंतु कोरोनामुळे ग्राहकाने पाठ फिरवल्यामुळे कपडे व तयार कपड्यांचा व्यवसाय यंदा अपेक्षित झाला नाही. कोरोनाने शेतकरी व नागरिक अडचणीत आल्याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे. 
- शिवाजी फटे,
कापड व्यावसायिक, हाजापूर 

शासनाचे फटाकेमुक्तीचे आवाहन आणि कोरोनामुळे परप्रांतीय कामगार न आल्यामुळे फटाक्‍यांचे अपेक्षित उत्पादन झाले नाही व इतर ठिकाणाहून आणलेल्या फटाक्‍यांना देखील अपेक्षित ग्राहक मिळाला नाही. याचा परिणाम व्यवसायावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. 
- आजाद दारूवाले,
फटाके विक्रेते 

संपादन : श्रीनिवास दुध्याल