esakal | आधुनिक झगमगाटातही ग्रामीण भागात दिवाळी सण होतोय पारंपरिक पद्धतीने साजरा ! 
sakal

बोलून बातमी शोधा

Vairag diwali.

दिवाळी म्हणजे दीपोत्सव, आनंद आणि उत्सवाची पर्वणी होय. दिवाळी सणात काळाबरोबर अनेक बदल स्वीकारत आधुनिक झगमगाटात हायटेक दीपावली साजरी होत आहे. पण यामध्येही जुन्या रूढी, परंपरा, प्रथांचे व संस्कृतीचे पालन करत ग्रामीण भागात दीपावलीत पाच दिवस घराच्या अंगणात पांडव, गवळणी घालण्याची परंपरा जपली जात आहे. 

आधुनिक झगमगाटातही ग्रामीण भागात दिवाळी सण होतोय पारंपरिक पद्धतीने साजरा ! 

sakal_logo
By
कुलभूषण विभूते

वैराग (सोलापूर) : दिवाळी म्हणजे दीपोत्सव, आनंद आणि उत्सवाची पर्वणी होय. दिवाळी सणात काळाबरोबर अनेक बदल स्वीकारत आधुनिक झगमगाटात हायटेक दीपावली साजरी होत आहे. पण यामध्येही जुन्या रूढी, परंपरा, प्रथांचे व संस्कृतीचे पालन करत ग्रामीण भागात दीपावलीत पाच दिवस घराच्या अंगणात पांडव, गवळणी घालण्याची परंपरा जपली जात आहे. 

एकादशीपासून सुरू झालेल्या दीपावली सणात आबालवृद्ध, महिला वर्गाची लगबग जोरदार दिसत आहे. आकाश कंदील, दिव्यांची झळाळी, सगळीकडे झगमगाट पाहायला मिळत आहे. व्हॉट्‌सऍप, फेसबुक, टीव्ही व प्रसारमाध्यमांतून बोलबाला करत ही दीपावली रंगीबेरंगी रूपडे, नवनवीन साज पांघरलेली दिसते. अशा हायटेक दीपोत्सवातही भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणा जपण्याचे काम ग्रामीण भागात आजही शेणाच्या पांडव व गवळणीतून आपणाला पाहायला मिळते आहे. 

एकादशीपासून वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा अर्थात पाडवा असे पाच दिवस घरातील अंगणात, तुळशी वृंदावनाजवळ शेणामातीचे पांडव व गवळणी- पेंद्या तयार केले जातात. त्याची मनोभावे पूजा करून नैवैद्य दाखवला जातो. सभोवताली सडासंमार्जन, सुबक रांगोळी, दिव्यांची आरास केली जाते. वैरागमधील संतनाथ कुरूलकर कुटुंबीयांकडून ही परंपरा बंगलो व फ्लॅटच्या जमान्यात आजही जपली जात आहे. 

महिला वर्ग यासाठी खास तयारी करत असल्याचे दिसते. खवय्यांसाठी दुकानांच्या थाटामाटातही घरोघरी पारंपरिक फराळाच्या पदार्थांची रेलचेल ही तर महिलांच्या सुगरणपणाची दाद मिळवणारी बाब दिसून येत आहे. कोरोना संसर्ग काळात ग्रामीण भागात आजही आबालवृद्ध दिवाळी सणाचा आनंद पारंपरिक पद्धतीने घेत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल