आई मेलेली, तरी पिल्लू दूध पीत होतं..! हृदय पिळवटून टाकणारी घटना 

Squirrel
Squirrel

माढा (सोलापूर) : माढ्यातील नितीन साठे हे शेतात टेहळणी करताना एक खारुताई मरण पावलेली दिसली. मात्र त्या खारीचे नवजात पिल्लू मृत आईचे दूध पीत असल्याचे दिसले. आई मृत पावल्याची कल्पनाही नसलेल्या त्या इवल्याशा पिल्लाकडे पाहून नितीन साठे यांचे मन हेलावून गेले. त्यांनी काही अंतरावरून हे दृश्‍य मोबाईल कॅमेऱ्यात टिपले. 
"सपने तज अपने सभी, सुखी रहे संतान 
चिंता वो सबकी करे, खुद से है अनजान 
पोथी पोथी पढ गए, मिला एक यही ज्ञान 
इस सारे संसार से, मॉं बडी महान'
 
या ओळीप्रमाणे या घटनेतील खारुताई मरण पावल्यानंतरही आई म्हणून पिल्लाला दिलासा मिळत असून, आई ही या संसारापेक्षा श्रेष्ठ असल्याचे नितीन साठे यांनी पाहिलेल्या व मोबाईलमध्ये घेतलेल्या छायाचित्रावरून लक्षात येते. 

निसर्गातच अनेक ठिकाणी जंगले कशी निर्माण झाली? अनेक भागांवर माणसाने न लावताही झाडे कशी उगवली? या सगळ्या गोष्टींचे गुपित या खारुताईमध्ये लपले असून, खारुताई ही वृक्षारोपणाची जनकच असल्याचे अभ्यासाअंती दिसून आले. 

वृक्षारोपणाचा जनक खारुताई
या घटनेबाबत माढ्यातील इन्स्पायर फाउंडेशन इंडियाचे पर्यावरण अभ्यासक मयूर चव्हाण व अजय शहा म्हणाले, खारीच्या मृत्यूमुळे केवळ तिचे पिल्लूच नव्हे तर निसर्गसुद्धा पोरका झाला आहे. कारण खार ही फळे, बिया व पालेभाज्या खाते. आपले अन्न अर्थात फळबिया व इतर झाडांच्या बिया साठवून ठेवण्यासाठी ती त्या बियांना ठिकठिकाणी खड्डे करून लपवून ठेवते. हे खड्डे हजारोंच्या संख्येने असतात. त्यामुळे इवल्याशा खारुताईला आपण कुठेकुठे बिया लपवल्यात हे ध्यानात राहात नाही. पुढे पावसाळ्यात या लपवून ठेवलेल्या खड्ड्यातील बियांवर पाण्याचा वर्षाव होतो. बिया अंकुरीत होऊन कालांतराने त्यांचे मोठमोठ्या झाडांमधे रूपांतर होते. आपल्या दोन ते चार वर्षांच्या आयुष्यात एक खारुताई अशा हजारो बिया लपवून ठेवते व त्यांवरच अनाकलनीयरीत्या छोटेमोठे वृक्ष उगवतात. एक खार तिच्या पूर्ण जीवनकाळात सुमारे हजारो झाडांचे रोपण करण्याची किमया नकळत साध्य करते. अशी पृथ्वीतलावरील जंगलांमधील व इतरत्र उगवणारी निम्मी झाडे ही खारीने लपवलेल्या बियांतूनच येतात, हे संशोधनातून सिद्ध झाले. निसर्गचक्रात व जैवविविधता जपण्यात खारीचे योगदान बेजोड आहे आणि म्हणूनच खारीचा मृत्यू हा निसर्गचक्रासाठी नुकसानकारक वाटतो. यामुळे खारुताईला वृक्षारोपणाचा जनक म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

बेसुमार वृक्षतोडीमुळे खारींची घरे धोक्‍यात आली आहेत. त्या घरांच्या भिंतींमध्ये निवारा शोधत आहेत. हिवाळ्यात, वर्षाकाळात व उन्हाळ्यात उष्माघाताने, उपासमारीने व पाण्याच्या कमरतेमुळे व रस्ते ओलांडताना वाहनाखाली येऊन अनेक खारी मृत्युमुखी पडतात. आता खारुताईंची व अशा अन्य जीवांची वाताहत थांबवण्यासाठी आक्रमकरीत्या वृक्षारोपण करायला हवे. निदान घरांच्या छतांवर किंवा अंगणात पक्ष्यांसोबतच खारींसाठीही पाण्याने भरलेली भांडी ठेवावी. घरातील शिलकीतले धान्य व उरलेले खाद्य त्यांच्यासाठी राखून ठेवावे व सजीवसृष्टीला लाखो झाडांच्या रूपातून मोफत प्राणवायू देऊन पूर्ण सजीवसृष्टीवर नकळत उपकार करणाऱ्या खारींना वाचविण्यात आपणही "खारीचा वाटा' द्यावा, असे आवाहन माढ्यातील इन्स्पायर फाउंडेशनने केले आहे. 

लहानांपासून वृद्धांपर्यंत परिचयाची व माणसाळलेली म्हणून तिला "खारुताई' म्हटले जाते. लंकेत प्रवेश करण्यासाठी सेतूबांधणी करत असताना खारुताईच्या समूहाने इवल्याशा हातांतून वाळूचे थर करून योगदान दिल्याने प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या पाठीवरून मायेने हात फिरवला. प्रभू रामचंद्रांचा वरदहस्त लाभल्याने ती देशभरात सर्वत्र लोकप्रिय झाली. उत्तर व दक्षिण भारतात खारींना पूज्यनीय समजले जात असून माणूस व खारीचे हे नाते पुरातन काळापासूनच अतूट आहे. 

या मुक्‍या प्राण्यांची एकमेकांवरील निष्ठा पाहून मला गहिवरून आले. खारुताईला निसर्गचक्रात एवढे महत्त्व आहे हे टीम इन्स्पायरमुळे प्रथमच कळाले. निसर्गातील पशू, पक्षी, प्राणी, झाडे या प्रत्येकाचे एक निश्‍चित स्थान आहे, ते टिकवून ठेवण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. 
- नितीन साठे,
माढा 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

महाराष्ट्र 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com