वंचित बहुजन आघाडीची बदलणार कार्यकारिणी 

तात्या लांडगे 
Monday, 2 November 2020

आगामी महापालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडी आता नव्या कार्यकर्त्यांना संधी देणार आहे. त्याची जबाबदारी प्रदेश प्रवक्‍ते आनंद चंदनशिवे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नूतन कार्यकारिणी निवडीवेळी जिल्हाध्यक्ष नाना कदम, जिल्हा महासचिव जावेद पटेल, कोषाध्यक्ष बबन शिंदे आदी उपस्थित असणार आहेत. 

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीची तालुका कार्यकारिणी बदलून पक्षाला पुन्हा बळ देण्याच्या दृष्टीने तालुकानिहाय दौरा निश्‍चित करण्यात आला आहे. 

आगामी महापालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडी आता नव्या कार्यकर्त्यांना संधी देणार आहे. त्याची जबाबदारी प्रदेश प्रवक्‍ते आनंद चंदनशिवे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नूतन कार्यकारिणी निवडीवेळी जिल्हाध्यक्ष नाना कदम, जिल्हा महासचिव जावेद पटेल, कोषाध्यक्ष बबन शिंदे आदी उपस्थित असणार आहेत. मोहोळ तालुक्‍यातील कार्यकारिणीसंबंधी मंगळवारी (ता. 3) दौरा केला जाणार आहे. तर त्याच दिवशी पंढरपुरातील कार्यकर्ते, आजी- माजी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. 4 नोव्हेंबरला मंगळवेढा, 5 नोव्हेंबरला अक्‍कलकोट, 6 नोव्हेंबरला बार्शी आणि 7 नोव्हेंबरला दक्षिण सोलापूर दौरा होईल, अशी माहिती चंदनशिवे यांनी दिली. दरम्यान, बैठकीचे ठिकाण निश्‍चित करून जिल्हा शाखेला सोशल मीडियातून कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांचा डोळा 
सोलापुरातील सुमारे दोनशे ग्रामपंचायतींसह पुढील दीड वर्षांत नगरपरिषदा, महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना, भाजप नेत्यांनी जिल्हानिहाय दौरे सुरू केले आहेत. शिवसेनेचे संपर्कमंत्री जाहीर झाल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सातारा, कोल्हापूर दौरा सुरू केला आहे. तर जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी नगरसह उस्मानाबादचे दौरे सुरू केले आहेत. पुढील आठवड्यात त्यांचा सोलापूर दौरा होईल. 

तत्पूर्वी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदर पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्र्यांनी विविध कारणास्तव सोलापूर दौरा केला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता वंचित बहुजन आघाडीनेही कंबर कसली आहे. आगामी काही दिवसांत ऍड. प्रकाश आंबेडकर सोलापूर दौऱ्यावर येतील, अशीही चर्चा आहे. दरम्यान, तालुका स्तरावरील कार्यकारिणी बदलून पक्षवाढीसाठी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अधिकाधिक जागा निवडून आणण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू केल्याचे चित्र आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The executive of the Vanchit Bahujan Aghadi will change