"उजनी'ची "जैवविविधता' येतेय समोर ! जलाशयात आढळले दुर्मिळ पाणमांजराचे अस्तित्व 

Auter
Auter

केत्तूर (सोलापूर) : अथांग भरलेल्या उजनी जलाशयाच्या फुगवट्यावरील (बॅकवॉटर) भागातील केत्तूर (ता. करमाळा) शिवारात रेल्वे पुलाजवळ गुरांना चारा टाकण्यासाठी गेलेल्या तरुण युवकास दुर्मिळ होत असलेल्या पाणमांजराचे दर्शन झाले. त्यामुळे उजनी जलाशय परिसरात पाणमांजराचे अस्तित्व आहे, हेही सिद्ध झाले आहे. 

उजनी जलाशयात जैवविविधताही विपुल प्रमाणात आहे, हे वेळोवेळी दिसून आलेले आहे. गेल्याच महिन्यात जगभरातून दुर्मिळ होत चाललेल्या इंडियन स्टार जातीचे कासव उजनी जलाशयाच्या 40 वर्षांच्या इतिहासात प्रथमच कोंढारचिंचोली (ता. करमाळा) जवळील डिकसळ (ता. इंदापूर) येथे मासेमारी करणाऱ्या पारधी समाजाच्या दाम्पत्यास सापडले होते. पुढे त्यांनी ते वनविभागाच्या ताब्यातही दिले होते. 

आज (सोमवार) सकाळी सातच्या दरम्यान जलाशयाजवळील शेतात गुरांना चारा टाकण्यासाठी सोमनाथ जरांडे हा युवक गेला होता. त्यांना अचानक एक वेगळाच प्राणी दिसला. साधारणपणे एक ते दीड फूट उंचीचा व तीन फूट लांबी असणारा हा काळ्या रंगाचा, त्याच्या तोंडावर मोठ्या मिशाही होत्या असा हा आगळावेगळा प्राणी पाण्याबाहेर आला होता. आवाजाने भीतिपोटी तो पुन्हा पाण्यात गेला व 10 ते 12 फूट अंतरावर पाण्याबाहेर डोके काढून पोहू लागला. प्राणी अभ्यासकांना हा त्याचा फोटो पाठवला असता, तो प्राणी दुर्मिळ होत चाललेले पाणमांजर असल्याचे सांगितले. उजनी जलाशय परिसरात प्रथमच दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या पाणमांजराचे अस्तित्व उजनी जलाशयात आहे, हे या वेळी दिसून आले व त्यामुळे उजनीची "जैवविविधता'ही समोर आली आहे. 

पाणमांजराचे प्रमुख खाद्य मासे, खेकडे व गोगलगायी हे आहे. वाढते प्रदूषण, पाणथळ जागा नष्ट होणे, शिकार, अनियंत्रित मासेमारी, माशांची कमतरता यामुळे या प्राण्याचे अस्तित्व सध्या तरी धोक्‍यात आले आहे. तसेच याच्या कातडीचा उपयोग तस्करीसाठी केला जात असल्याने पाणमांजरांची संख्या वरचेवर कमी होत आहे. 

पाणमांजर हा प्राणी लाजरा-बुजरा असल्याने सहसा कोणाच्याही दृष्टिक्षेपात येत नाही. जलाशयाशी संबंध असणाऱ्या लोकांनाच पाणमांजर कधीतरी दिसते. पाणमांजराचे इंग्लिश नाव "ऑटर' असे आहे. किनाऱ्यावर, दगडाच्या खाचा तसेच मोठ्या झाडाच्या पसरलेल्या मुळांच्या विस्तीर्ण छायेत पाणमांजर राहते. नदीतील मासे, खेकडे, कासव, नदीतील साप, प्रसंगी जमिनीवरील पक्षी हे त्याचे खाद्य आहे. जलाशयात मोठ्या चपळाईने माशांचा पाठलाग करून मासे स्वाहा करतो. शक्‍यतो हे मांजर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळते. 
- डॉ. अरविंद कुंभार,
ज्येष्ठ प्राणीशास्त्रज्ञ व पर्यावरण अभ्यासक 

दुर्मिळ देशी - विदेशी पक्षी, प्राणी, जलचर यांचा अधिवास हे उजनी जलाशयासाठी भूषणावह बाब आहे. यासाठी या सर्वांचेच संवर्धन व संरक्षण होणे गरजेची बाब आहे. 
- कल्याणराव साळुंके,
पक्षीप्रेमी, कुंभेज 

पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे तसेच वाढत्या प्रदूषणामुळे उजनी जलाशयातील जलचर वरचेवर नामशेष होत आहेत तर काही दुर्मिळ होऊ लागले आहेत. भरपूर पाण्यात आढळणारे पाणमांजर त्यापैकीच एक. अशा प्रकारच्या दुर्मिळ जलचर प्राण्यांचे अस्तित्व अबाधित राहणे गरजेचे आहे. 
- राहुल इरावडे,
पक्षीप्रेमी, केत्तूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com