"कांदा निर्यातबंदी म्हणजे शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार'; कांदा उत्पादकांचा संताप

राजाराम माने 
Thursday, 17 September 2020

गुलमोहरवाडी येथील शेतकरी सुरेश माने म्हणाले, आता दोन पैसे मिळत असतानाच शेतकऱ्यांना पैसे मिळू नयेत यासाठीच केंद्र सरकारने निर्यातबंदी केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा मी निषेध करतो. निर्यातबंदी त्वरित उठवावी. 

केत्तूर (सोलापूर) : गेल्या काही दिवसांपासून उन्हाळी कांद्याच्या दरात 40 ते 50 टक्‍क्‍यांनी वाढ झाली होती. त्यामुळे कांदा उत्पादक खुशीत होता. परंतु देशातील कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातबंदी जाहीर केली आणि वाढू लागलेले कांद्याचे दर एकदम घसरले. कोणतीही पूर्वसूचना न देता ही निर्यातबंदी केल्याने अगोदरच कोरोना महामारीच्या संकटातील शेतकरी आणखी संकटात सापडला आहे. आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना "तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार' देण्याचा जाणूनबुजून प्रकार सरकार करीत असल्याचे मत शेतकऱ्यांतून व्यक्त केले जात आहे. केंद्र सरकारने निर्यातबंदी जाहीर केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांत केंद्र सरकारच्या विरोधात रोष वाढला आहे. 

हेही वाचा : मुसळधार पावसाने आलेल्या पुरात चालकासह एक कार, दोन मोटारसायकली गेल्या वाहून 

अगोदरच शेतकऱ्यांनी बराकीत ठेवलेल्या कांद्याची बाजारपेठेत आवकच झाली नाही. त्यातच अनलॉकमध्ये हॉटेल व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने निश्‍चितच कांद्याला मागणी वाढणार होती. त्यामुळे कांद्याच्या दरात निश्‍चितच वाढ होऊन शेतकऱ्यांना फायदाच झाला असता. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याच्या दरावर नियंत्रण मिळवून शहरी लोकांच्या हितासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कांदा उत्पादकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अगोदरच कोरोना महामारीचा सर्वांत जास्त फटका शेतकऱ्यांनाच बसला आहे. कोणत्याच पिकाला योग्य दर नाही, त्यातच निसर्गाची साथही मिळत नाही. त्यातच पावसाने "दुष्काळात तेरावा' घातल्याने संकटात मात्र भरच पडली आहे. आज किंवा उद्या भाव मिळेल, या आशेने बराकीत ठेवलेला कांदा आता तसाच वाया जाणार आहे. 

हेही वाचा : राज्यपालसाहेब, जसं कंगना, शर्माबद्दल तुम्हाला वाईट वाटलं, तसं माझ्याविषयीही वाईट वाटू द्या! भेटीसाठी सोलापूरच्या शेतकऱ्याचे पत्र 

पोमलवाडी येथील शेतकरी रामदास बागल म्हणाले, केंद्राच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे शासन शेतकऱ्याच्या हातात पैसा देणार नाही असेच दिसत आहे. हा निर्णय त्वरित मागे घ्यावा. 

गुलमोहरवाडी येथील शेतकरी सुरेश माने म्हणाले, आता दोन पैसे मिळत असतानाच शेतकऱ्यांना पैसे मिळू नयेत यासाठीच केंद्र सरकारने निर्यातबंदी केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा मी निषेध करतो. निर्यातबंदी त्वरित उठवावी. 

पारेवाडी येथील शेतकरी बिभीषण पवार म्हणाले, निर्यातबंदी जाहीर झाल्याबरोबर कांद्याचे वाढू लागलेले दर उतरले आहेत. अगोदरच कोणत्याच शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी नेहमीच संकटात सापडत आहे. 

कोर्टी येथील शेतकरी धनंजय गोसावी म्हणाले, निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांना तोटा व व्यापाऱ्यांचा मात्र फायदा होणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers have expressed outrage over the decision to ban onion exports