
माळशिरस तालुक्यातील शेतकरी गत वर्षापासून प्रथम दुष्काळ, अवेळी पाऊस, अतिवृष्टी, महापूर या संकटांच्या मालिकेमुळे देशोधडीला गेला होता. त्यातून कसाबसा सावरत असतानाच आताच्या ढगाळ व थंड वातावरणामुळे पुरता नेस्तनाबूत झाला आहे.
अकलूज (सोलापूर) : माळशिरस तालुक्यातील शेतकरी गत वर्षापासून प्रथम दुष्काळ, अवेळी पाऊस, अतिवृष्टी, महापूर या संकटांच्या मालिकेमुळे देशोधडीला गेला होता. त्यातून कसाबसा सावरत असतानाच आताच्या ढगाळ व थंड वातावरणामुळे पुरता नेस्तनाबूत झाला आहे.
माळशिरस तालुक्यात अतिवृष्टी व महापुरामुळे अनेक शेतकऱ्यांची उभी पिके, बागा शेतीसह वाहून गेल्या. अतिवृष्टीने खरीप पिकांची नासाडी झाली. खरीप वाया गेला तर अतिरिक्त पावसामुळे शिवारे पेरणीयोग्य नसल्याने रब्बी हंगाम लांबला. त्यामुळे शेतकरी कोणत्याही परिस्थितीत रब्बी हंगामाची पेरणीची कामे लवकर उरकून घेण्याच्या नादी लागला. पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतीची कामे एकाच वेळेस आल्याने मजुराने आपली मजुरी दुप्पट केली. त्यातूनही कशीबशी पेरणी उरकली; परंतु आता आलेल्या ढगाळ व थंड वातावरणामुळे ज्या शेतकरी बांधवांनी लवकर पेरणी केली आहे, त्यांच्या गव्हावर पांढरी टीक व हरभऱ्यावर अळी तर फुलोऱ्यात व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेल्या तुरीस अळींचा प्रादुर्भाव वाढेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजीपाला पिकांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे तसेच डाळिंब व द्राक्ष पिकांवरही या हवामानाचा विपरीत परिणाम होणार असून, ढगाळ हवामान व पावसाच्या हलक्या सरी यामुळे औषधांच्या फवारण्या वाढणार असल्याचे शेतकरी वर्गातून सांगितले जात आहे. आधीच कोरोनामुळे शेतमालास उठाव नव्हता, त्यामुळे हाती आलेली पिके रानातच सोडून द्यावी लागली. त्यातच अस्मानी संकटांची मालिका सुरू असून, आजची सकाळ जरी निरभ्र आकाश व सूर्यप्रकाशाने सुरू झाली असली तरी पुढे कोणते संकट येईल या भीतीने शेतकरी धास्तावला आहे. एकंदरीत, हे वर्ष शेतकऱ्यांना संकटग्रस्त ठरले आहे. गेल्या तीन दिवसांच्या ढगाळ वातावरणाचा परिणाम बाजारपेठेवरही झाला असून, बाजारपेठेत ग्राहकच नाही.
ढगाळ वातावणामुळे टोमॅटोवर करपा पडला आहे. त्यासाठी औषधांची फवारणी करावी लागत असून, उत्पादन खर्च वाढत आहे. शिवाय टोमॅटोवर डाग आल्याने दरही कमी मिळणार आहे.
- अर्जुन जठार,
शेतकरी, यशवंतनगर, अकलूज
ढगाळ वातावरणामुळे डाळिंबावर मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, त्याचा उत्पादनावर परिमाण होईल. त्यामुळे नुकसान सहन करावे लागणार आहे.
- नितीन साखळकर,
शेतकरी, चौंडेश्वरवाडी, अकलूज
संपादन : श्रीनिवास दुध्याल