'दखल घेईपर्यंत मागे हटणार नाही !' महामार्गबाधित शेतकऱ्यांचे प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण 

शशिकांत कडबाने 
Saturday, 3 October 2020

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखीमार्ग व म्हसवड-कुर्डुवाडी महामार्गाचे बाधित शेतकरी अकलूज प्रांत कार्यालयासमोर उपोषणास बसले असून, शासनाने तीन दिवसांच्या या उपोषणाची दखल न घेतल्यास तेच उपोषण पुढे दखल घेईपर्यंत चालू ठेवणार असून, मागे हटणार नाही, असा निर्धार बाधित शेतकऱ्यांनी केला आहे. 

अकलूज (सोलापूर) : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखीमार्ग व म्हसवड-कुर्डुवाडी महामार्गाचे बाधित शेतकरी अकलूज प्रांत कार्यालयासमोर उपोषणास बसले असून, शासनाने तीन दिवसांच्या या उपोषणाची दखल न घेतल्यास तेच उपोषण पुढे दखल घेईपर्यंत चालू ठेवणार असून, मागे हटणार नाही, असा निर्धार बाधित शेतकऱ्यांनी केला आहे. 

संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाचे बाधित शेतकरी नवनाथ बधे आणि पोपट चव्हाण यांनी या उपोषणाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार यांच्यासह जिल्हाधिकारी यांना ई-मेलद्वारे निवेदन दिले आहे. या निवेदनात शेतकऱ्यांकडून जुन्या रस्त्याची जमीन विनामोबदला घेतली असल्याने आता संपूर्ण 45 मीटर रुंदीच्या जमिनीचा मोबदला मिळावा, शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी वकिलास वेळ द्यावी, शेतकऱ्यांनी वेळोवेळी घेतलेल्या हरकतींची लेखी उत्तरे मिळावीत, आपली नेमकी किती जमीन अधिग्रहणात जाते व त्याचा किती मोबदला मिळणार याची माहिती लेखी मिळावी, सर्व व्यवहार खरेदीखताने व्हावा यासह अनेक मागण्यांबाबत प्रांत कार्यालयाकडे सतत पाठपुरावा करूनही काहीच माहिती मिळत नाही. 

वरील विविध मागण्यांबाबत लोकशाही मार्गाने व कोरोनाबाबतची सर्व दक्षता घेत याआधीही 2 सप्टेंबर रोजी एकदिवसीय उपोषण करण्यात आले होते. त्या वेळी प्रांताधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. उपोषणकर्त्यांना सक्षम न भेटता असहिष्णुतापूर्वक व हेटाळणीयुक्त व्यवहार करून अन्याय केला आहे. याचा निषेध तसेच सर्व कायदेशीर व रास्त मागण्यांबाबत योग्य न्याय मिळावा यासाठी हे तीन दिवसांचे उपोषण असून, याचीही दखल न घेतल्यास हेच उपोषण पुढे न्याय मिळेपर्यंत चालू ठेवणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. 

उपोषणाचा आज दुसरा दिवस असून काल शुक्रवार (ता. 2) सायंकाळी चारनंतर प्रांत कार्यालयाकडून आधिकारी श्री. कारंडे हे पत्र घेऊन आले होते. परंतु त्या पत्रात मागण्यांबाबतचे कोणतेही आश्वासन न देता फक्त उपोषणापासून परावृत्त व्हा, एवढाच उल्लेख असल्याने ते स्वीकारले नसल्याचे उपोषणकर्ते नवनाथ बधे यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers who lost their land on the highway went on a hunger strike in Akluj