ना उरला बांध ना उरली माती, सांगा कशी करावी शेती? व्यथा भोगावती नदीकाठच्या शेतकऱ्यांची

रमेश दास 
Monday, 26 October 2020

भोगावती नदीला येऊन गेलेल्या महापुरात देगाव (वा) (ता. मोहोळ) येथील चार शेतकऱ्यांची नदीकाठी असलेली पाच एकर दहा गुंठे शेतीच वाहून गेली आहे. एक इंच मातीचा थर तयार व्हायला हजार वर्षे लागतात; इथे तर चाळीस ते पन्नास फुटांचा थरच वाहून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. 

वाळूज (सोलापूर) : भोगावती नदीला येऊन गेलेल्या महापुरात देगाव (वा) (ता. मोहोळ) येथील चार शेतकऱ्यांची नदीकाठी असलेली पाच एकर दहा गुंठे शेतीच वाहून गेली आहे. एक इंच मातीचा थर तयार व्हायला हजार वर्षे लागतात; इथे तर चाळीस ते पन्नास फुटांचा थरच वाहून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. "ना उरला बांध ना उरली माती, सांगा कशी करावी शेती?' असा पेच शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. 

मोहोळ तालुक्‍यातील देगाव (वा) येथील भोगावती नदीवर असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या लगत असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याबरोबर वाहून गेल्याने त्या शेतकऱ्यांना, आम्ही आता जगायचं कसं व करायचं काय, असा प्रश्न पडला आहे. येथील शेतकरी दादासाहेब आतकरे यांची तीन एकर वीस गुंठे, इंद्रसेन आतकरे यांची तीस गुंठे, सुरेश आतकरे यांची वीस गुंठे तर हणमंत पवार यांची वीस गुंठे अशी पाच एकर दहा गुंठे जमीनच वाहून गेली आहे. या ठिकाणी जमीन वाहून जाऊन सुमारे पन्नास ते साठ फूट खोल खड्डे पडले असून या ठिकाणावरूनच आता नदी प्रवाह बदलून वाहते आहे. 

या जमिनी वडिलोपार्जित असल्याने कष्टाने जतन केल्या होत्या. शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह याच शेतीवर होता. या जमिनीत कांदा, ऊस, सोयाबीन, भेंडी यासह इतर पिके होती. नदीने आपल्या प्रवाहाची दिशाच बदलल्याने व पाण्याच्या वेगवान प्रवाहाने या शेतकऱ्यांची उरलीसुरली शेती आणखीन वाहून जात आहे. या बंधाऱ्याचा भराव अशाच प्रकारे मागील तीन वर्षांपूर्वी आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. त्या वेळीही हीच जमीन वाहून गेली होती. गेल्या वर्षी 90 लाख रुपये खर्चून दुरुस्ती करण्यात आली, मात्र सर्व पाण्यात गेले आहे. 

आम्ही जगावं की मरावं? 
देगाव (वा.) येथील नुकसानग्रस्त शेतकरी दादासाहेब आतकरे म्हणाले, भोगावती नदीच्या काठावर असलेली तीन एकर वीस गुंठे बागायती जमीन पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. आमचं व्हत्याचं नव्हतं झालं आहे. मायबाप सरकारनं आतातरी आमच्याकडे बघावं. आम्ही आता जगावं की मरावं, अशी आमची अवस्था झाली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The farms along the Bhogawati river were swept away by the floods