ब्रेकिंग ! आचारसंहिता भंगप्रकरणी माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल 

deepak_salunkhe
deepak_salunkhe

मंगळवेढा (सोलापूर) : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजप खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्यावरही मंगळवेढा पोलिसात आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी 1 डिसेंबर रोजी मंगळवेढा येथील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या दिवशी सकाळी सहा ते मतदान संपेपर्यंत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे 144 कलम लागू केले होते. माजी आमदार साळुंखे-पाटील यांनी मंगळवारी (ता. 1) दुपारी तीनच्या दरम्यान मतदानादिवशी मतदारांवर प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने मतदान केंद्रात विनापरवाना प्रवेश केला.

याप्रकरणी केंद्राध्यक्ष दत्तोबा मच्छिंद्र पडवळे यांनी फिर्याद दिली आहे. माजी आमदार साळुंखे-पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शशिकांत चव्हाण यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली होती. यामध्ये त्यांनी म्हटले होते, की पदवीधर निवडणुकीत शहरातील बूथ क्रमांक 394, 395, 396 मतदान सुरू असतानाच मध्ये जाऊन बॅलेट पेपर चेक केले आणि आतमध्ये फिरून आले. त्यांचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. 

चौकशीकामी जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे नोडल अधिकारी तथा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांची नियुक्ती केली. त्यानंतर क्षेत्रीय अधिकारी एस. एल. मेटकरी यांनी पदवीधर मतदान केंद्र 394, 395 , 396 चा 4 डिसेंबर रोजीचा व साई सर्व्हिसेस पुणे यांच्याकडे वेब कास्टिंग रेकॉर्डिंग हार्ड डिस्क याचे अवलोकन करून सदर गुन्हा दाखल करण्यासाठी जलसंपदा विभागाचे दत्तोबा मच्छिंद्र पडवळे यांना प्राधिकृत केले. 

खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यावरही राष्ट्रवादीने केलेल्या तक्रारीनंतर पंढरपुरात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीनंतर अखेर मतदान केंद्राध्यक्षांनी गुन्हा दाखल केला. परस्परविरोधी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाल्याने पदवीधर मतदार संघातील निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी महाविकास आघाडी व भाजपत सुरू झालेली तक्रारीची राजकीय दंगल भविष्यात कोणत्या राजकीय वळणावर नेते, याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com