शेकडो वर्षांच्या इतिहासात पंढरी प्रथमच सुनीसुनी; हजारो लोकांचे अर्थकारण अडचणीत 

अभय जोशी 
सोमवार, 22 जून 2020

जगायचे कसे हा प्रश्‍न 
आषाढी यात्रेतील 15 दिवस आमच्या कमाईचा मुख्य काळ असतो. परंतु, यंदा आषाढी यात्रा भरणार नाही. मागील चार महिन्यांपासून आमचे काम ठप्प झाले आहे. जगायचे कसे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. उसनेपासने करून सध्या आम्ही दिवस काढत आहोत. शासनाने आम्हाला मदत केली पाहिजे. 
- दत्तात्रय पिंगळे, विक्रेते, तुळशी माळा 

पंढरपूर (सोलापूर) : दरवर्षी आषाढी यात्रेच्या एक महिना आधीपासूनच पंढरपूरकरांना यात्रेचे वेध लागलेले असतात. विविध व्यावसायिक यात्रेच्या गडबडीत व्यस्त असतात. आषाढी एकादशीच्या आठ, 10 दिवस आधीपासून वारकऱ्यांची पंढरपुरात गर्दी होते. यंदा मात्र कोरोना असल्याने यात्रा भरणार नाही. आषाढी एकादशी 10 दिवसांवर आलेली असताना पंढरपुरात सामसूमच आहे. यात्रेच्या शेकडो वर्षांच्या इतिहासात यावेळी पंढरी सुनीसुनी पाहण्यात येत आहे. 
दरवर्षी आषाढी यात्रेसाठी विविध संतांच्या पालख्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान होते. त्यानंतर काही दिवसांनी शेकडो वारकरी गर्दीमुळे दर्शन होणार नाही म्हणून पालखी सोहळ्यातून वाहनातून पुढे पंढरपूरला येतात आणि श्री विठ्ठलाचे दर्शन घेतात. यंदा आषाढी एकादशी 1 जुलैला आहे. परंतु, कोरोनाने यंदा यात्रा भरू शकणार नसल्याने ऐन यात्रेत यंदा प्रथमच पंढरपुरात सामसूम आहे. कोरोना असल्याने यंदा यात्रा भरणार नसल्याने पंढरपुरातील सर्व व्यापारी चिंतेत आहेत. तुळशीच्या माळा, तबला-डग्गा, मृदंग, एकतारी, वीणा अशी विविध प्रकारची वाद्ये, लाखेचे चुडे, पेढे, चुरमुरे, बत्तासे यांना यात्रेत मोठी मागणी असते. परंतु, यंदा यात्रेकरूंना पंढरपुरात येण्यास प्रशासनाने बंदी केलेली असल्याने संबंधित कारागीर काम नसल्याने आर्थिक अडचणीत आहेत. मागील काही महिन्यांपासून काम नसल्याने संसाराचा गाडा चालवायचा कसा, असा यक्ष प्रश्‍न या नागरिकांपुढे उभा आहे. 
तुळशीच्या माळा बनवण्याचा व्यवसाय काशीकापडी समाजातील महिला व पुरुष वर्षानुवर्षे करत आहेत. यात्रेच्या एक महिना आधी त्यांची तयारी होते. शहरातील बत्तासे, साखर फुटाणे, साखरेच्या कांड्या बनवण्याचे काम एक महिना आधी सुरू होते. त्यासाठी अशा कारखान्यांतून जास्त कामगार लावलेले असतात. परंतु, यंदा हे कारखाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे. 
दरवर्षी यात्रेच्या एक महिना आधी लाखेच्या बांगड्या (चुडे), दगडी मूर्ती, फोटोफ्रेम बनवणाऱ्या कारागिरांचे अहोरात्र काम सुरू असते. आषाढी यात्रेत या सर्व मालाची मोठी उलाढाल होत असते. त्यामुळे पंढरपूरच्या अर्थकारणात आषाढी यात्रा अतिशय महत्त्वाची समजली जाते. संबंधित सर्व व्यावसायिक जास्तीतजास्त माल बनवून यात्रेत चार पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतात. यंदा मात्र कोरोना असल्याने चित्र वेगळे आहे. यात्रा आलेली असूनही सर्वच व्यावसायिक काम नसल्याने बसून आहेत. यात्रेतील उलाढालीतून दरवर्षी मिळणारे पैसे यंदा मिळणार नसल्याने अवलंबून असणाऱ्या शेकडो नागरिकांचे अर्थकारण अडचणीत आले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For the first time in the history of hundreds of years Pandharpur silent thousands of people in financial difficulties