
वसूल केलेली कारखानानिहाय रक्कम
सोलापूर : कामगारांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात करुनही कामगारांना ती रक्कम मिळत नसल्याच्या तक्रारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या. त्यानंतर क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे यांनी सोलपूर, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील कारखाने, बॅंक, शैक्षणिक संस्थांकडून चार कोटी 14 लाख 39 हजार 543 रुपयांची रक्कम वसूल केले आहेत.
वसूल केलेली कारखानानिहाय रक्कम
ई- पीएफ कायद्याअंतर्गत 2019 पर्यंतचा भविष्य निधी न भरल्यामुळे जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांच्या विरोधात अर्ध न्यायिक चौकशी करण्यात आली. त्यात भीमा सहकारी साखर कारखाना, गोकूळ शुगर्स, विठ्ठल सहकारी साखर कारखाना, मकाई साखर कारखाना, सीताराम महाराज साखर कारखान्याचा समावेश होता. या कारखान्यांकडून तीन कोटी 27 लाख 94 हजार 161 रुपये वसूल केल्याची माहिती डॉ. तिरपुडे यांनी दिली. तसेच शहर- जिल्ह्यातील 24 संस्था तथा कंपन्यांविरुध्द कारवाई करुन उर्वरित रक्कम वसूल केल्याचेही ते म्हणाले. सहायक भविष्य निर्वाह निधी आयुक्त पुरुषोत्तम मीना यांनी आरआरसी जाहीर केल्यानंतर या कारखान्यांची बॅंक खाती सील करून 86 लाख 45 हजार 382 रुपयांची रक्कम वसूल केली. भविष्य निधी कार्यालयाचे के. भानूप्रकाश आणि प्रतीक लाखोले यांनी ही कारवाई केली. त्यात महाराष्ट्र नागरी सहकारी बॅंक, लातूर, भैरवनाथ शुगर वर्क्स, वाशी (उस्मानाबाद), वर्धमान हायटेक ऍग्रो प्रॉडक्ट्स (मोहोळ), यशवंत महाविद्यालय, उदगीर (लातूर), भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना, उमरगा (उस्मानाबाद) आणि आदिनाथ सहकारी साखर कारखाना (करमाळा) यांचा समावेश असल्याचेही तिरपुडे यांनी स्पष्ट केले. या कारखान्याकडे साडेसहा कोटींची रक्कम थकीत असून त्यासाठी कारखान्याकडील 25 हजार क्विंटल साखर जप्त केली असून त्याचा 5 फेब्रुवारीला लिलाव असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.