तीन जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील व्यापारी केंद्र असलेल्या नातेपुते ग्रामपंचायतीचा पाच वर्षांचा लेखाजोखा

Natepute
Natepute

नातेपुते गाव हे पुणे-सातारा-सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील व्यापारी केंद्र आहे. या ग्रामपंचायतीवर सत्ता असणे म्हणजे माळशिरस तालुक्‍यावर सत्ता असल्यासारखे समजले जाते. नातेपुते गावचे सरपंच म्हणून ऍड. भानुदास राऊत यांनी 11 नोव्हेंबर 2015 रोजी सूत्रे स्वीकारली. सरपंच पदावर आरूढ होताना त्यांनी ग्रामदैवत शंभू महादेवाला स्मरून "मी भ्रष्टाचार करणार नाही, सहकाऱ्यांना करू देणार नाही.' अशी शपथ घेतली होती. त्यानुसार त्यांनी आपला पाच वर्षांचा कार्यकाल 10 नोव्हेंबर 2020 पर्यंत यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. 

माजी सरपंच (कै.) रघुनाथशेठ उराडे, पोलिस पाटील राजेंद्रभाऊ पाटील, दादासाहेब उराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य होऊ शकले. उपसरपंच सुनंदा उराडे आणि इतर सर्व 15 ग्रामपंचायत सदस्यांनी आपापल्या परीने गावाच्या विकासासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येते व सत्ताधाऱ्यांना मदत केली. सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांनी आपल्या गटातील सदस्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते. 

विधान परिषद सदस्य ऍड. रामहरी रूपनवर हे सरपंच ऍड. भानुदास राऊत यांचे जीवलग स्नेही आहेत. आमदार रूपनवर यांनीही नातेपुतेसाठी जास्तीत जास्त सरकार दरबारातून विविध कामे मंजूर करून आणली. यांच्या कारकिर्दीत चौदाव्या वित्त आयोगाचा अडीच कोटी व दलित वस्ती सुधार योजनेतून एक कोटी असा साडेतीन कोटींचा निधी विविध कामांसाठी खर्च करण्यात आला. सरपंच राऊत यांच्या विशेष प्रयत्नांमुळे नातेपुते गावाचा पालखी तळाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा प्रश्न सुटला आहे. 

खासगी मालकांची 61 गुंठे जागा शासनाने बाजारभावाप्रमाणे विकत घेऊन पालखी तळासाठी अधिग्रहण केली आहे व पूर्वीची एक हेक्‍टर 2 आर एकूण आजअखेर 1 हे. 63 आर जागा पालखी तळासाठी उपलब्ध झाली आहे. तसेच नातेपुते गावाचा विस्तार व व्यापारपेठ दिवसेंदिवस वाढत आहे, हे लक्षात घेऊन 90 टक्के भूमिगत पाइप गटाराची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच मुख्य बाजारपेठ, स्मशानभूमीजवळचा परिसर, जानकर वस्ती, पालखी तळाच्या पूर्वेचा रस्ता, काळे प्लॉटिंग, मरीमाता मंदिरासमोरील रस्ता, राऊत वस्ती, काळे वस्ती, 45 फाटाकडील गॅस गोडाउन जवळील रस्ता डांबरीकरण केलेला आहे. तसेच जुना शिंगणापूर रोड, उमाजी नाईक नगर, फिरंगाई मंदिराजवळील रस्ता, शिक्षक कॉलनी, अहिल्या चौक, सोरटे, साळवे वस्ती या ठिकाणी रोड केलेला आहे. बौद्धनगर परिसरात दलित वस्ती योजनेतून भूमिगत गटार व पेव्हर ब्लॉकिंगचे काम झालेले आहे. रमामाता चौक, साठेनगर येथे कॉंक्रिटीकरणाचे काम प्रास्तावित आहे. 

विस्तारित पाणी योजना कार्यान्वित केलेली आहे. अंगणवाडी सुशोभीकरण करणे व अंगणवाडीसाठी मुलांना खेळणी व इतर साहित्यासाठी पाच लाख रुपये खर्च केले आहेत. मराठी शाळांना संगणक संच व इतर सुविधा, त्यासाठी दोन लाख व स्मशानभूमी, पर्वतेश्वर मंदिर पेव्हर ब्लॉक विविध योजनेतून बसवलेले आहेत. शहरात जवळपास सुमारे 25 लाख रुपयांचे पंचवीस हायमास्ट दिवे बसवले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयावर पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर सभागृह व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृह ही 20 लाख रुपयांची कामे पूर्ण केली आहेत. तसेच दोन्ही सभागृहांच्या कामांच्या पूर्ततेसाठी 15 लाख रुपयांची आर्थिक तरतूद केलेली आहे. या सभागृहासाठी आमदार रामहरी रूपनवर यांनी आमदार निधीतून 10 लाख दिले आहेत. 

नातेपुते शहरात व वाड्या-वस्त्यांवर विद्युत खांबांवरील ट्यूबलाईट काढून 200 एलईडी लॅम्प बसवले आहेत. आमदार राम सातपुते यांच्या निधीतून लक्ष्मी मंदिराजवळ पाच लाख रुपयांचे काम केले जाणार आहे. ग्रामदैवत शंभू महादेवाच्या समोरील शिवकालीन तळ्याचे सुशोभीकरण आमदार रामहरी रूपनवर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मंजूर झाले आहे. यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद झालेली आहे. 25 लाख रुपयांची कामे झालेली आहेत. शहरालगतच्या गणगे वस्ती, राऊत वस्ती या ठिकाणी रोड झालेले आहेत. पंचायत समिती सदस्य माऊली पाटील यांनी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या आमदार निधीतून 20 लाख रुपयांची कामे मंजूर करून आणलेली आहेत. शिक्षक कॉलनी, उमाजी नाईक नगर येथे दहा लाख रुपयांचे रस्ते झालेले आहेत व दहा लाख रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. 

पाच वर्षांत दिसून आलेला जास्तीत जास्त विकासकामे करण्याचा प्रयत्न 
शहरातील बहुतेक रस्त्यांचे डांबरीकरण झालेले आहे. शासनाच्या नियमानुसार पेव्हर मशिनद्वारे गावातील सर्व रस्त्यांवर कार्पेटचा शेवटचा हात दिला जाणार आहे. या पाच वर्षांच्या काळात बहुतेक रस्त्यांचे डांबरीकरण व भूमिगत गटारांची कामे झाल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. सरपंच, उपसरपंच यांच्या बरोबरीनेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी व प्रशासन यांनी या पाच वर्षांत जास्तीत जास्त विकासकामे करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. 

मी पूर्वी 15 वर्षे ग्रामपंचायत सदस्य, पाच वषे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले असल्यामुळे व सर्व ग्रामस्थांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवल्यामुळे विकासासाठी जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केले. मी माझ्या कारकिर्दीवर समाधानी आहे. 
- ऍड. भानुदास राऊत, सरपंच, नातेपुते 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com