Photo : सलग तिसऱ्या दिवशीही पंढरपूर पाण्यात ! "भीमा'त 2.91 लाख क्‍युसेकचा विसर्ग; "एनडीआरएफ'ची टीम दाखल

अभय जोशी 
Friday, 16 October 2020

उजनी आणि वीर धरणातून सोडलेले पाणी पंढरपूर शहराच्या अनेक भागात शिरले आहे. शहरात पाणी आलेले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आज (शुक्रवारी) सकाळी दोन तास पाण्याची पातळी स्थिर झाली होती; परंतु त्यानंतर पाण्याची पातळी पुन्हा वाढू लागली. सकाळी सात वाजता पंढरपूर येथे भीमा नदीत 2 लाख 87 हजार क्‍युसेक इतका विर्सग होता. सकाळी अकरा वाजता तो वाढून 2 लाख 91 हजार इतका झाला होता. 

पंढरपूर (सोलापूर) : उजनी आणि वीर धरणातून सोडलेले पाणी पंढरपूर शहराच्या अनेक भागात शिरले आहे. श्री विठ्ठल मंदिराच्या तीनही बाजूंना पाणी आहे. परंतु चौफाळा, पश्‍चिमद्वार या बाजूने मंदिराकडे जाता येत आहे. शहरात पाणी आलेले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आज (शुक्रवारी) सकाळी दोन तास पाण्याची पातळी स्थिर झाली होती; परंतु त्यानंतर पाण्याची पातळी पुन्हा वाढू लागली. सकाळी सात वाजता पंढरपूर येथे भीमा नदीत 2 लाख 87 हजार क्‍युसेक इतका विर्सग होता. सकाळी अकरा वाजता तो वाढून 2 लाख 91 हजार इतका झाला होता. 

Image may contain: outdoor and water

उजनी आणि वीर धरणातून सोडलेले पाणी काल येथे पोचले. काल दिवसभर आणि रात्रीतून वेगाने पाणी वाढले. परंतु प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने वेळीच योग्य दक्षता घेतल्याने नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केले. 

Image may contain: one or more people, people sitting and outdoor

नदीच्या लगतच्या लखुबाई पटांगण, गोविंदपुरा, तांबडा मारुती, भजनदास चौक, घोंगडे गल्ली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, संतपेठ या भागात काल पुराचे पाणी शिरल्याने तेथील वीज पुरवठा दक्षता म्हणून खंडित करण्यात आला होता. मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी नगरपालिकेची यंत्रणा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तयार ठेवली आहे. 

Image may contain: sky, bridge, outdoor, water and nature

प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण पवार यांनी आज पहाटेपासून शहरातील पूरग्रस्त भागात होडीतून फिरून पाहणी केली आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. पंढरपूरमधील भीमा नदीवरील तीनही पुलांवर पाणी आलेले असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. पंढरपूर परिसरात काल आणि आज सकाळी पावसाने उघडीप दिली आहे. 

Image may contain: outdoor

दरम्यान, आज सकाळी गजानन महाराज मठ, गौतम विद्यालय, इंदिरा गांधी भाजी मंडई, महाद्वार या भागात आज पुराचे पाणी आले आहे. घोंगडे गल्लीसह काही भागात सामाजिक कार्यकर्त्यांनी सकाळी दुधाच्या पिशव्यांचे वाटप केले. सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ उराडे यांनी अन्य सहकाऱ्यांच्या माध्यमातून घोंगडे गल्ली भागातील काही लोकांना "सकाळ'चे अंक वितरित केले. 

Image may contain: tree, plant, outdoor, water and nature

महसूल प्रशासनाने दक्षता म्हणून एनडीआरएफची टीम पंढरपूर येथे मदतीसाठी मागवली होती. ती टीम पंढरपुरात दाखल झाली आहे. तहसीलदार डॉ. वाघमारे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके हे ग्रामीण भागातील पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 

Image may contain: outdoor and water

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood water infiltrated in many parts of Pandharpur