पूर ओसरला पण, समस्यांच्या महापुराचं काय ? 

seena revers mahapur
seena revers mahapur

बेगमपूर (जि. सोलापूर ) : नदीचा पूर ओसरला पण समस्यांचा महापूर अद्यापही कायम आहेत. संपूर्ण गावचा वीजपुरवठा खंडित, नागरिकांना पिण्याचे पाणी नाही, सरकारी आरोग्य सेवेचाही पुरता खेळ खंडोबा, एव्हढेच नव्हे तर पूर काळात व नंतरही तलाठ्यापासून ते तहसीलदारापर्यंत, ना कोणी अधिकारी आले ना कोणी तालुका वा जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी ना पदाधिकारी. ही व्यथा आहे सीना नदीकाठावरील मोहोळ तालुक्‍यातील पीरटाकळी गावची. 

केवळ कामती पोलिस ठाण्याचे सहकार्य व ग्रामस्थांनी एक होऊन परिस्थितीवर मात केली संकट तर टाळलंय पण लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या बेफीकिरीच काय? असा प्रश्न ग्रामस्थांतून विचारला जातोय. पिर टाकळी हे जवळपास दोन हजार लोकवस्तीच गांव. दोन ते तीन दिवसांपूर्वीच सीना नदीला आलेल्या पुराने सुंपूर्ण गावाला वेढा दिला. सीना काठाने इतिहासात प्रथमच एवढा मोठा पूर पहिला. पुराच्या पाण्याने गावाला चारी दिशाने वेढले होते. वीज पुरवठा खंडित झाल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. गावात येणारे शिरापूर विरवडे व शिंगोली तरटगाव रस्त्यावर पाणी आल्याने गावात येण्यासाठी योग्य रस्ताच नाही म्हणत महसूल विभागाची कोणतीही यंत्रणा गावात पोहचू शकली नाही. परंतु कामती खुर्दच्या गोडबोले प्रशालेसमोरून येणाऱ्या उजनी कॅनलवरून कामती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी सोलापूर मंगळवेढा महामार्गावरील ठेकेदार दिलीप बिल्डर्सकडून सहकार्य घेत वाहनांची सोय केली आणि गावातील सुमारे तीनशेहून अधिक पूर बधितांना गावाजवळील कामती खुर्द येथील गोडबोले माध्यमिक प्रशाला, तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था, बंडू सावंत यांच्या वस्ती आदी ठिकाणी स्थलांतरीत केले. या कालावधीतही प्रशासनाने विस्थापितांची कसलीच व्यवस्था केली नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. विशेष म्हणजे पूर काळात पोलिस वगळता गावकामगार तलाठी, मंडलअधिकारी, तहसीलदार, आरोग्य विभागाचे अधिकारी वा कोणत्याही लोकप्रतिनिधीनी ना भेटी दिल्या ना कोणत्याही प्रकारच्या सुविधा पुरविल्या. 

मुख्यमंत्र्यांनी पुरकाळात महसूल विभागाच्या तलाठी, मंडल अधिकारी, आरोग्य यंत्रणेला गावात राहण्याचे आदेश दिले होते, परंतु संबधित विभागाने याबाबीचे गांभीर्याच घेतले नसल्याने दिसून आले. विशेष म्हणजे तलाठ्याने पूर बधितांची माहिती दुसऱ्या गावात थांबूनच मोबाईलवरूनच घेतल्याने ग्रामस्थांनी सांगितले. 

पुराच्या पाण्यामुळे कोलमडलेली वीज यंत्रणा कामती महावितरण विभागाचे कनिष्ठ अभियंता आर.ए.अत्तार यांनी अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने केवळ गावचा वीजपुरवठा सुरळीत केल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. परंतु शेतीपंपाचा वीजपुरवठा अद्याप खंडितच आहे. शिंगोली पिरटाकळी, शिरापूर विरवडे या मुख्य रस्त्यावर पुराचे पाणी ओसरल्याने सध्या गाळ पसरला असल्याने वाहतुकीचा प्रश्न बिकट बनला आहे, संबंधित विभागाने याबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी महेश धुमाळ यांनी केली आहे. 

दरम्यान, गावातील पन्नासहून अधिक घरात पुराचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तुंचे मोठे नुकसान झाले आहे. गावात व घरात पाणी घुसलेल्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यादृष्टीने आरोग्य यंत्रणा अद्यापही सुस्त असल्याचे दिसत आहे. पुराच्या पाण्याबरोबर वाहत आलेल्या सापांचा गावात वावर वाढला आहे. त्यामुळे ग्रामस्थांत वेगळीच भीती आहे. केवळ पुरकाळात सरपंच कालिंदी धुमाळ, युवा कार्यकर्ते महेश धुमाळ, पोलिस पाटील शंकर पाटील, हेड कॉन्स्टेबल यशवंत कोटमळे, हेड कॉन्स्टेबल नायकवडी, गणेश थिटे, संतोष सावंत, हनुमंत खळसोडे, भारत निबांळकर, ग्रामपंचायत कर्मचारी श्रीमंत जाधव, श्रीमंत कदम, जय महाराष्ट्र नवरात्र उत्सव मंडळ व अन्य ग्रामस्थांनी प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता मदत केली.मात्र, वीज, रस्ता, आरोग्य व समस्याचा महापूर मात्र कायम आहे. 

संपादन : अरविंद मोटे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com