नागरिकांनो, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घ्या स्वतःची व कुटुंबाची काळजी : माजी आमदार जयवंतराव जगताप 

अण्णा काळे 
Monday, 14 September 2020

नागरिकांनी स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाची व गावाची काळजी घेण्याच्या दृष्टीने नेहमी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. कारण कोरोना बाधितांची संख्या वाढल्यास आरोग्य विभागासह सर्वच प्रशासकीय विभाग हे सक्षमपणे सेवा देण्यास हतबल आहेत, याचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले. 

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात व तालुक्‍यात नागरिक काळजी घेत नसल्यामुळे कोरोना समूह संसर्ग वाढत असल्याचे चित्र असून, स्वतःची व कुटुंबाची काळजी घेण्यासाठी सर्वांनी मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करावा; तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे स्वयंशिस्तीने पालन करावे, असे आवाहन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले आहे. सध्या करमाळ्यात लाकडाउन करण्यावर मतभेद सुरू असताना, कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांना माजी आमदार जगताप यांनी हे अवाहन केले आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना माजी आमदार जयवंतराव जगताप म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव सुरू झाल्यानंतर करमाळा तालुक्‍यातील महसूल व पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, करमाळा नगरपरिषदेचे अधिकारी व पदाधिकारी, तालुका व शहरातील सर्वच स्वयंसेवी संस्था व जनतेने घेतलेल्या काळजीमुळे व प्रभावीपणे राबविलेल्या उपाययोजनांमुळे आपण कोरोना संसर्ग रोखण्यात यशस्वी झालो होतो.

परंतु अनलॉकची प्रक्रिया सुरू होऊन जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच आपलेही कोरोना संसर्गाच्या फैलावाबाबतचे गांभीर्य कमी होऊन झालेल्या निष्काळजीपणामुळे शहर तसेच तालुक्‍यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. हे चित्र निश्‍चितच दुःखदायी व वेदनादायी असून सर्वच नागरिकांनी स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाची व गावाची काळजी घेण्याच्या दृष्टीने नेहमी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. कारण कोरोना बाधितांची संख्या वाढल्यास आरोग्य विभागासह सर्वच प्रशासकीय विभाग हे सक्षमपणे सेवा देण्यास हतबल आहेत, याचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MLA Jayawantrao Jagtap appealed to the people to be careful to prevent corona infection