पोषण आहारातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी चौघांची समिती ! उमेश पाटील यांनी केला भ्रष्टाचाराचा आरोप 

umesh patil - Copy.jpg
umesh patil - Copy.jpg

सोलापूर : शालेय पोषण आजार कोरोनामुळे आता धान्याच्या स्वरुपात दिला जात आहे. मात्र, या परिस्थितीचा लाभ घेत महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत चालणाऱ्या पोषण आहार विभागाने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश पाटील यांनी स्टॅण्डींग समितीच्या बैठकीत केला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेतही सविस्तर माहिती दिली. त्यांच्या आरोपातील तथ्य शोधण्यासाठी समिती नियुक्‍तीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

चौघांची समिती देणार महिन्यांत अहवाल 
शालेय पोषण आहारात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप उमेश पाटील यांनी आज केला. त्यांनी हा आरोप करताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत, राज्य सरकारच्या निर्णयाची प्रत जोडून मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे दिली. पाटील यांच्या आरोपतील तथ्य शोधण्यासाठी सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य, वित्त विभागातील अधिकाऱ्यांची चार सदस्यीय समिती नियुक्‍त केली आहे. या समितीने महिनाभरात सखोल चौकशी करुन अहवाल द्यावा, असे आदेश दिल्याचे श्री. स्वामी यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

जिल्हा परिषदेअंतर्गत शाळांमधील तीन ते सहा वर्षे वयोगटातील सुमारे 75 हजार मुलांना दरमहा शालेय पोषण आहार दिला जात आहे. शालेय पोषण आहाराचा विशेषत: कुपोषित तथा कुपोषणाच्या उंबरठ्यावरील बालकांच्या आहाराचा दर्जा ठरला आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने संबंधित विभागाला तसे निर्देशही दिल्याचे पाटील म्हणाले. तरीही जिल्हा परिषदेतील पोषण आहार विभागाने डाळ व तेलाचा पुरवठा पुरेशा प्रमाणात केलेला नाही. दुसरीकडे आहारात तृणधान्य व डाळीचे प्रमाण 4:1 असे असायला हवे. मात्र, या विभागाने त्याचे उल्लंघन करुन 10:1 अशा प्रमाणात पोषण आहार वाटप केला आहे. भ्रष्ट नफेखोरीत बेधुंद झालेल्या पोषण आहार विभागाला पुरवठा होणाऱ्या पाककृतीतील उष्माकांचेही भान राहिले नाही, असाही आरोप त्यांनी यावेळी केला. मुलांना 500 पेक्षा कमी उष्माकांचे धान्य देऊन या विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचाही अवमान केल्याचे उमेश पाटील म्हणाले. 'झुठा पोषण, कौन रोशन' असे म्हणत त्यांनी यामागे कोण आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणीही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्षांकडे केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com