मोफत लुसलुशीत हुरडा खायचा आहे, तर अक्कलकोटला या ! प्रमोद पाटलांनी आयोजित केला हुरडा महोत्सव

Hurda Party
Hurda Party

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट येथील प्रगतशील शेतकरी प्रमोद प्रकाश पाटील आयोजित मोफत हुरडा महोत्सव 2021 चे उद्‌घाटन अभिनव शिवलिंग महास्वामी व श्री बसवलिंग महास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा युवा नेते शंकर म्हेत्रे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मुंबईचे उद्योगपती किरण हंचाटे होते. 

या वेळी बसवराज शास्त्री, शंकरराव देशमुख, गुरू पाटील, मल्लिनाथ पाटील, प्राचार्य सुरेश नंदगाव, आयोजक प्रमोद पाटील व संयोजक शिवराज चंद्रामप्पा बिराजदार, कृष्णा बेंबळकर, रमेश झिंगाडे, विश्राम पटेल, नंदू हंचाटे, रामचंद्र गद्दी, अशोक ऊर्फ धोनी वरदाळे, रफिक पटेल, रेवणप्पा बोरगाव, इरण्णा करवीर, विद्याधर गुरव, डॉ. बसवराज चिणकेकर, जगू शेटे, किरण नरेगल आदी हुरडा महोत्सवच्या पहिल्या दिवशी उपस्थित होते. 

वर्षाकाठी सहा ते सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळते ते नुकसान सोसून व स्वतःच्या व्यापार- व्यवसायाकडे दुर्लक्ष करून दररोज सुमारे चारशे ते पाचशेपेक्षाही जास्त लोकांना मोफत हुरड्याचा आस्वाद देऊन दरवर्षी दीड महिना हुरडा महोत्सव गेल्या 11 वर्षांपासून आयोजित केला जात आहे. या हुरडा महोत्सवाचे यंदाचे बारावे वर्ष असून, प्रमोद पाटील व शिवराज बिराजदार स्वतः येणाऱ्या सर्वांना आस्थेने हुरडा खाऊ घालतात. प्रमोद पाटील हे व्यापारी असून त्यांची एकूण 45 एकर शेती आहे. त्यामध्ये आठ एकर द्राक्ष, तीन एकर डाळिंब, दोन एकर बोर, सात एकर ऊस, तूर, उडीद, शेवंती फूलशेती तसेच विविध ज्वारीचे अनेक प्रकार आदी पिके असून पाच एकर ज्वारीचे पीक फक्त हुरड्यासाठी दरवर्षी राखून ठेवले जाते. राहिलेल्या ज्वारीचे बी व वाळलेल्या हुरड्याची रास करून नागरिकांना मोफत दिले जाते, ज्यात सुरती, कचकची, नरीबाला, फुले, उत्तरा गुळबंडी आदी जातीच्या हुरड्याचा समावेश असतो. 

दरवर्षी जानेवारीमध्ये हुरडा महोत्सवास सुरवात होते तो महिना दीड महिना सुरू असतो. पण यंदाच्या वर्षी मात्र पाऊस भरपूर झाला. जमिनीला उशिरा वापसा आल्याने पेरणीस विलंब लागला. त्यामुळे हुरडा देखील या वर्षी उशिराने 7 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. यासाठी राजकीय, सामाजिक, सर्व समाज घटकातील, सर्वधर्मीय उपस्थित राहतात. स्वतःचा व्यापार- व्यवसाय सोडून प्रमोद पाटील व शिवराज बिराजदार हे हुरड्याची सेवा देतात. दररोज दिवसभर चारजण कणसे सोलून देतात तर चार महिला कणसे काडून आणतात. सोलापूर, मुंबई, पुणे, कर्नाटकातून देखील शेकडो जण, परदेशी पर्यटक येत असतात. सर्वांमध्ये स्नेहभाव वाढावा, सहकार्य भावना वाढावी या उद्देशाने हुरडा महोत्सव सुरू करण्यात आला. व्यापारी तत्त्व नाही. ज्वारीचे बियाणे (कचकची) शेतकऱ्यांना मोफत दिले जातात. 

सर्वच बाबतीत आर्थिक दृष्टिकोनातून पाहून चालत नाही. नि:स्वार्थ भावनेने हुरडा खायला घातल्याने एक प्रकारे मनाला शांती मिळते. दैव आशीर्वीदाने सगळे सुरळीत आहे. सात बोअरला भरपूर पाणी आहे. तीन विहिरींतही मुबलक पाणी आहे. जे येईल त्यांचे स्वागत आहे. त्यांना हुरडा खाऊ घालतो, ते लोकांच्या इच्छाशक्तीने साध्य होते. 
- प्रमोद पाटील, 
हुरडा महोत्सवाचे संयोजक 

एकमेकांत स्नेह व बंधुभाव वाढावा या उद्देशाने गेल्या 12 वर्षांपासून हुरडा महोत्सवाचे आयोजन आमच्याकडे केले जात आहे. दररोज सुमारे 400 ते 500 कुटुंबीय येऊन हुरड्याचा आस्वाद घेतात. 
- शिवराज बिराजदार, 
संयोजक 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com