"मी एकाच पावसात तुडुंब भरले, तरी यांचे पाण्याचे राजकारण काही संपत नाही !'

Politics.
Politics.

दक्षिण सोलापूर (सोलापूर) : कधी माझ्या मजबुतीकरणावरून, खोलीकरणावरून तर कधी माझ्या कुशीत पाणी आणण्यावरून कायम राजकारण करणारे आज माझ्या जलपूजनासाठीही चक्क सोबत राजकारण घेऊनच आले. हे राजकारण संपावे म्हणूनच मी एकाच पावसात तुडुंब भरले तरी यांचे राजकारण काही संपत नाही, अशी भावना कदाचित तिला बोलता आले असते तर त्या "सीतामाई'ने व्यक्त केली असती. निमित्त होते शुक्रवारी (ता. 25) झालेल्या मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथील बहुचर्चित सीतामाई तलावातील पाणीपूजनाचे. 

उत्तरा नक्षत्राच्या एकाच पावसाने मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथील सीतामाई तलाव तुडुंब भरला आणि राजकारण सुरू झाले. सीतामाई तलावातील जलपूजन करण्यासाठी राजकीय मंडळींनी लगेच मोर्चेबांधणी केली अन्‌ शुक्रवारचा मुहूर्त काढला. तलावाच्या मजबुतीकरणाचे काम जिल्हा परिषदेकडून करण्यात आल्याने सकाळी नऊ वाजता महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून जलपूजन झाले. तर खोलीकरणाचे काम आमदार निधीतून करण्यात आल्याने भाजपकडून सकाळी अकरा वाजता जलपूजन करण्यात आले. दोन तासांत एकाच जागी दोन वेगवेगळ्या नेत्यांनी जलपूजन केल्याचा अनुभव दस्तुरखुद्द "सीतामाई'नेच अनुभवला. या जलपूजनाची चर्चा मात्र परिसरात व तालुक्‍यात होती. 

शुक्रवारी सकाळी अकरा वाजता आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते सीतामाई तलावातील जलपूजन करण्यात आले. या वेळी अप्पर तहसीलदार उज्ज्वला सोरटे, सरपंच कलावती खंदारे, उपसरपंच अलाउद्दीन शेख, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष गौरीशंकर मेंडगुदले, माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे, माजी सरपंच विश्वनाथ हिरेमठ, पिरप्पा म्हेत्रे, ग्रामपंचायत सदस्य नितीन रणखांबे, दयानंद ख्याडे, बसवराज घाटे, दत्तात्रय देशमुख, भाजपचे सरचिटणीस यतिन शहा, हणमंत कुलकर्णी, रामचंद्र वाडकर, सिद्धेश्वर हेळकर, वाघेश म्हेत्रे, चिदानंद मुगळे, आमसिद्ध पुजारी आदी उपस्थित होते. 

या वेळी आमदार देशमुख म्हणाले, सीना-भीमा नदीजोड प्रकल्पाला मान्यता मिळाल्याने परिसरात सिंचनाचे क्षेत्र वाढणार आहे. नेहमी कोरडी असणारी सीना नदी बारमाही वाहणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना फायदा होईल. केंद्र सरकारच्या मनरेगा योजनेतून रोजगार निर्मिती करून पाणंद रस्त्यांसह इतर कामांना गती देण्यात येणार आहे. मंद्रूपमध्ये औद्योगिक वसाहत होत असल्याने त्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले. 

गौरीशंकर मेंडगुदले यांनी सीतामाई तलावातील खोलीकरणासाठी आमदार निधी दिल्यामुळेच मोठ्या प्रमाणात पाणी साठवण झाल्याचे सांगितले. तहसीलदार सोरटे यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी शासन प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. 

दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सकाळी नऊ वाजताच जलपूजन उरकले. या वेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील, माजी कृषी सभापती अप्पाराव कोरे, जिल्हा परिषद सदस्या विद्युल्लता कोरे, जिल्हा परिषद सदस्य ऍड. संजय गायकवाड, माजी उपसरपंच रमेश नवले, माजी सरपंच सूर्यकांत ख्याडे, अप्पासाहेब व्हनमाने, प्रभाकर कोरे, अनंत म्हेत्रे, प्रा. उमाशंकर रावत, अप्पासाहेब शिळ्ळे, सिकंदर आवटे, सिद्धाराम काळे, उस्मान नदाफ, लक्ष्मण रणखांबे आदी उपस्थित होते. 

या वेळी घटक पक्षांच्या सहाय्याने येथील प्रश्न सोडविण्यासाठी तसेच पिकांची नुकसानभरपाई मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. ग्रामपंचायतीची सत्ता असताना सीतामाई तलावाच्या विकासासाठी प्रयत्न केल्याचे श्री. नवले यांनी सांगितले. तर सीतामाई तलाव सुशोभिकरणासाठी व पर्यटनस्थळ करण्यासाठी पर्यटन मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे श्री. कोरे यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com