मोहोळ शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी 27 कोटींच्या निधीला तत्त्वतः मान्यता !

राजकुमार शहा 
Thursday, 7 January 2021

मोहोळ शहराचा पाणीप्रश्न तसा खूप जुना आहे. अनेक राजकीय नेत्यांनी व विविध राजकीय पक्षांनी शहरवासीयांना पाणीपुरवठ्याचे गाजर दाखवून सत्ता भोगली आहे; तसेच राजकारणही केले आहे. मात्र पाणी प्रश्न तसाच प्रलंबित राहिला. 

मोहोळ (सोलापूर) : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मोहोळ शहराच्या कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यासाठी 27 कोटी रुपयांच्या निधीला तत्त्वतः मान्यता मिळाल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस रमेश बारसकर यांनी दिली. आष्टी तलावातून सुमारे 22 किलोमीटर जलवाहिन्या टाकून शहराला पाणीपुरवठा करण्याचीही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेमुळे शहरवासीयांना कायमस्वरूपी पिण्याचे पाणी मिळणार आहे. 

मोहोळ शहराची लोकसंख्या हद्दवाढ भागासह सुमारे 40 हजार एवढी आहे. मोहोळ शहर हे मुंबई - हैदराबाद महामार्गावरील केंद्रबिंदू आहे. या ठिकाणाहून राज्यात सर्वत्र जाता येते. विविध सोयी - सुविधांमुळे शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. अनेक शासकीय कर्मचारी निवृत्तीनंतरही या ठिकाणी स्थायिक झाले आहेत. शहराचा पाणी प्रश्न तसा खूप जुना आहे. अनेक राजकीय नेत्यांनी व विविध राजकीय पक्षांनी शहरवासीयांना पाणीपुरवठ्याचे गाजर दाखवून सत्ता भोगली आहे; तसेच राजकारणही केले आहे. मात्र पाणी प्रश्न तसाच प्रलंबित राहिला. 

मोहोळ ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रूपांतर झाल्यानंतर 2016 मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत त्या वेळी रमेश बारसकर यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शहरवासीयांचा पाणीप्रश्‍न कायमस्वरूपी निकाली काढण्याचे जाहीरनाम्याच्या माध्यमातून वचन दिले होते. दरम्यान, आमदार अजित पवार यांची राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर त्यांच्या सत्कारासाठी बारसकर हे मुंबई येथे गेले होते, त्या वेळी त्यांनी सत्कार करून उपमुख्यमंत्री पवार यांना शहराची पाण्याची अडचण सांगून निधीची मागणी केली होती. त्या वेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी बारसकर यांना निधी देण्याचे आश्वासन दिले होते. 

दरम्यान, गुरुवारी (ता. 7) दुपारी 2.45 वाजता मंत्रालयातील उपमुख्यमंत्री पवार यांच्या दालनात मोहोळ शहराच्या पाणी पुरवठ्याबाबत बैठकीचे आयोजन केले होते. त्या बैठकीत चर्चा होऊन शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी 27 कोटींच्या निधीला तत्त्वतः मंजुरीचे पत्र देण्यात आले. या वेळी आमदार यशवंत माने, जिल्हा राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील, नगराध्यक्षा शाहीन शेख, संतोष सुरवसे, तसेच नगरपरिषदेचे काही नगरसेवक, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

गेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत शहरवासीयांना पाणीप्रश्न कायम निकाली काढण्याचे वचन दिले होते. त्याची पूर्तता करण्याचा मी प्रयत्न केला आहे. सत्ता असो वा नसो, शहराचा विकास हाच माझा ध्यास असणार आहे. 
- रमेश बारसकर, 
प्रदेश चिटणीस, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

आष्टी तलावातून पोखरापूर तलावात पाणी आणून सोडणे व तेथून ते शहराला कमी खर्चात पुरवठा करणे, अशा आशयाचा प्रस्ताव भाजपचे तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिला होता. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी आम्हीही प्रयत्न केला होता. 
- सतीश काळे, 
माजी तालुकाध्यक्ष, भाजप, मोहोळ 

आष्टी तलावातून मोहोळ शहराला पाणीपुरवठा करायचा म्हटलं तर तलावात उजनी धरणातून ज्यादा पाणी सोडण्याची तरतूद करावी लागेल. कारण, सध्याचे तलावातील असणारे पाणी हे विविध पिण्याच्या पाण्याच्या योजना आष्टी उपसा सिंचन योजना यासाठी बुकिंग आहे. शहरवासीयांची पाण्याची किती मागणी येते त्यावर पुढचे नियोजन करावे लागेल. 
- धीरज साळे, 
अधीक्षक अभियंता, पाटबंधारे विभाग 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A fund of Rs 27 crore was sanctioned for water supply of Mohol city