मालमत्ता मूल्यांकनाच्या "इतके' टक्‍के गाळे भाडे? सर्वसाधारण सभेत होणार निर्णय 

तात्या लांडगे 
Monday, 14 September 2020

शहरात महापालिकेचे मेजर व मिनी शॉपिंग सेंटरमध्ये एक हजार 409 गाळे आहेत. तर 375 खुल्या जागा असून त्या भाडे तत्त्वावर देण्यात आल्या आहेत. त्यापैकी 325 जागांची मुदत काही दिवसांपूर्वीच संपुष्टात आली आहे; तर काही गाळे, अभ्यासिका, समाज मंदिरांचीही मुदत संपली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता भाड्याची नव्याने आकारणी केली जाणार आहे. भूमी व मालमत्ता विभागाने शासनाचे नवे परिपत्रक नगररचना विभागाला आणि सर्वसाधारण सभेकडे पाठविले आहे. सुधारित भाड्यासंदर्भात आगामी सर्वसाधारण सभेत चर्चा केली जाणार आहे. 

सोलापूर : कोरोनामुळे राज्यांचीच नव्हे तर केंद्राची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जीएसटी अनुदानाबाबत हात वर केले असून, काही काळ राज्यांनी स्वत:हून ठोस उपाय शोधावेत, असे स्पष्ट केले आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने स्वच्छता व आरोग्य उपविधी कर आकारण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला. आता महापालिकेचे शहरांमधील गाळे, खुल्या जागांच्या भाड्याचा दर निश्‍चित करण्याचे स्वतंत्र परिपत्रक पाठविले आहे. त्यानुसार गाळेधारकांना भाड्यापोटी मोठी रक्‍कम मोजावी लागणार आहे. तत्पूर्वी, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील निर्णयाकडे लक्ष लागले आहे. 

शहरात महापालिकेचे मेजर व मिनी शॉपिंग सेंटरमध्ये एक हजार 409 गाळे आहेत. तर 375 खुल्या जागा असून त्या भाडे तत्त्वावर देण्यात आल्या आहेत. त्यापैकी 325 जागांची मुदत काही दिवसांपूर्वीच संपुष्टात आली आहे. तर काही गाळे, अभ्यासिका, समाज मंदिरांचीही मुदत संपली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता भाड्याची नव्याने आकारणी केली जाणार आहे. भूमी व मालमत्ता विभागाने शासनाचे नवे परिपत्रक नगररचना विभागाला आणि सर्वसाधारण सभेकडे पाठविले आहे. सुधारित भाड्यासंदर्भात आगामी सर्वसाधारण सभेत चर्चा केली जाणार आहे. मात्र, लॉकडाउनमधून सावरून नुकतेच व्यवसाय सुरू झाले असल्याने आता ही भाडेवाढ गाळेधारकांना परवडेल का, गाळ्यांचा लिलाव केल्यास त्याला प्रतिसाद कसा असेल, भाडेवाढीतून महापालिकेला किती रक्‍कम अधिक मिळेल, याचा अभ्यास नगररचना विभागाकडून युद्धपातळीवर सुरू झाले आहे. 

महापालिकेच्या भूमी व मालमत्ता अधीक्षक सारिका आकुलवार म्हणाल्या, मागील 50 वर्षांपासून महापालिकेच्या मालकीचे गाळे, खुल्या जागांचे भाडे आयुक्‍तांनी निश्‍चित केलेल्या दरानुसारच घेतले जात होते. आता शासनाकडून सुधारित परिपत्रक प्राप्त झाले आहे. त्यानुसार मालमत्तेच्या एकूण मूल्यांकनाच्या आठ टक्‍के तथा बाजारभावानुसार निश्‍चित होणारे वार्षिक भाडे, यापैकी ज्यादा असलेले भाडे गाळेधारकांना द्यावे लागणार आहे. मात्र, त्याबाबत सर्वसाधारण सभेत निर्णय होईल. 

महापालिकेच्या मालमत्तेबाबत... 
शहरातील 25 इमारती महापालिकेचे आहेत 590 गाळे (मेजर शॉपिंग सेंटर) 
बीओटी तत्त्वावरील 166 गाळे; मिनी शॉपिंग सेंटरमध्ये आहेत 653 गाळे 
महापालिकेच्या 375 पैकी 325 खुल्या जागांचा भाडे करार संपुष्टात 
156 समाज मंदिरांपैकी 57 समाज मंदिरांची संपली मुदत 
शहरात महापालिकेच्या मालकीच्या 57 अभ्यासिका; 32 अभ्यासिकांची मुदत संपली 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The general meeting of the Solapur municipal corporation will decide to increase the rent of shops