कर्जमाफी, मराठा आरक्षण व अतिवृष्टी मदतीच्या मुद्‌द्‌यावर सरकारची दिशाभूल : भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील 

chandrkant patil.jpg
chandrkant patil.jpg

सोलापूर ः कर्जमाफी, शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत, मराठा आरक्षण या मुद्‌द्‌यांवर राज्य सरकार हे पध्दतशीरपणे दिशाभूल करत आहे. सरकारने चालवलेल्या या प्रकाराबद्दल येत्या अधिवेशनात आम्ही सरकारला धारेवर धरणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली. 
येथील हेरीटेज गार्डनमध्ये शुक्रवारी (ता.29) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
हे सरकार सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफीची घोषणा झाली. नियमित कर्ज भरणाऱ्यांना पन्नास हजार रुपये देणार. ओटीएस योजनेचा लाभ देणार या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. कोरोना काळात एकाही कामगार व बलुतेदाराला कोणतीच आर्थिक मदत केली नाही. या उलट केंद्राने पुरवलेल्या उपचार साहित्याची मदत केली गेली. नंतर अतिवृष्टीमेध्य सांगली, सोलापूरसह पुर्व विदर्भात नुकसान झाले. पण मंत्र्यांनी पाहणीची नाटके केली. कोकणात देखील निसर्ग चक्रीवादळात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत दिली नाही. पीक विमा कंपन्याशी बोलणी करून शेतकऱ्यांना निदान विमा भरपाई देण्याची सोय देखील केली नाही. सरकारी मदत नाही व विमा भरपाई नाही अशी स्थिती शेतकऱ्यांच्या बाबतीत झाली. केंद्राच्या कृषी कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी पुर्वीपासून महाराष्ट्रात सुरू आहे. आता मराठा आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावर सरकारचे नेते ओबीसी विरुध्द मराठा असा वाद लावून मुळ आरक्षणाबाबत दिशाभूल करीत आहेत. मराठा आरक्षण करायचे नाही म्हणून आता महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद उकरून काढला जात आहे. प्रत्यक्षात कर्नाटकातील 842 मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात यावीत अशी आमची भूमिका आहे. 
मंत्री धनंजय मुंढे यांनी स्वतः त्यांचे महिलेशी असलेले संबंध व झालेल्या मुलांना स्वतःचे नाव दिल्याचे सांगितले आहे. हे कोणत्या नैतिकतेमध्ये बसते किंवा त्यांनी निवडणूक शपथपत्रात नोंद केली आहे का हा मुद्दा असताना रेणू शर्मा प्रकरणाकडे लोकांचे लक्ष वेधले जात आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या बाबत मंत्रीमंडळातील सहकारी म्हणून निर्णय घ्यायला हवा. या सर्व प्रश्‍नावर आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला जाब विचारणार आहोत. 
केंद्राचे कायदे आधीपासून महाराष्ट्रात लागू आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना कोणतीही अडचण नाही. मग चर्चेत सहमती न घालता वाद वाढवणे, प्रजासत्ताक दिनी हिंसा करणे या प्रकारामागे काय आहे असा प्रश्‍न पडतो. राज्य घटनेची शपथ घेणारे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झालेल्या हिंसेचे समर्थन कसे करू शकतात ? हा खरा प्रश्‍न आहे. हिंसा व हिंसेच्या समर्थकांचा आम्ही निषेध करतो. अण्णा हजारे यांनी या वयात उपोषण करू नये ही भूमिका घेऊन आम्ही त्यांच्याशी बोलतो आहोत. हे सरकार पडेल असे आपण म्हटलो नाही ते सांगण्यासाठी मी ज्योतिषी नाही असे त्यांनी स्पष्ट केले. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा स्विकार केला तरी ते परप्रांतियाबाबत त्यांची भूमिका बदलत नाही तो पर्यंत त्यांच्याशी युती करता येणार नाही ही भाजपची भूमिका आहे. 
यावेळी श्री. पाटील यांच्या समवेत आमदार विजयकुमार देशमूख, आमदार सुभाष देशमूख, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शहाजी पवार, शहराध्यक्ष विक्रम देशमुख उपस्थित होते. 


काय म्हणाले चंद्रकांत पाटील ? 
- कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळालाच नाही 
- कोरोना काळात बलुतेदार व कामगारांना मदत नाही 
- धनंजय मुंढे प्रकरण कोणत्या नैतिकतेमध्ये बसते ? 
- परप्रांतियांबद्दलची भूमिका राज ठाकरे यांनी बदलल्याशिवाय युती शक्‍य नाही 
- अतिवृष्टीग्रस्तांना मदत नाही 
- कोरोना उपचारासाठी सर्व उपचार साहित्याचा केंद्राकडून पुरवठा 
- मराठा - ओबीसी वाद व सीमा वाद काढून मराठा आरक्षणाच्या मुद्‌द्‌याला बगल  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com