मंगळवेढा ग्रामपंचायत निवडणुका म्हणजे विधानसभा पोटनिवडणुकीची रंगीत तालीम ! भालके-परिचारक गटांची कसोटी

हुकूम मुलाणी 
Tuesday, 12 January 2021

मंगळवेढा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके, पांडुरंग कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाचा कस लागणार असला तरी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांच्यासाठी पोटनिवडणूक व दामाजी कारखाना या दोन निवडणुकांमुळे त्यांच्याही नेतृत्वाची कसोटी ठरणार आहे. 

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यातील 22 ग्रामपंचायतींच्या 186 जागांसाठी 464 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात असले तरी आगामी पोटनिवडणूक व दामाजी कारखान्याच्या निवडणुकीचा विचार करता, तीन साखर कारखान्यांच्या अध्यक्षांसाठी ही निवडणूक रंगीत तालीम ठरणार आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष निवडणुकांचे असले तरी गुलाल कुणाचा उडणार? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. 

23 ग्रामपंचायतींमधील मुढवी ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर याशिवाय इतर 22 ग्रामपंचायतींमधील 28 सदस्य बिनविरोध झाले. चौदाव्या वित्त आयोगाचा निधी मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीच्या खात्यावर थेट जमा झाल्यामुळे ग्रामपंचायती मालामाल झाल्या व विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी ग्रामपंचायतीचा ठराव आणि त्यातील प्राधान्यक्रम महत्त्वाचा असल्यामुळे साहजिकच गावगाड्याच्या राजकारणात गट मजबूत करणे महत्त्वाचे ठरू लागले. सर्वच नेत्यांना आता ग्रामपंचायतीवर सत्ता महत्त्वाची वाटू लागली. गावगाड्यातील गट मजबुतीचा लाभ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबरोबर विधानसभा, लोकसभा व मोठ्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी होत असल्याने सर्वच राजकीय नेत्यांनी गावगाड्यात लक्ष घातले आहे. सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पॅनेलची उभारणी करताना कोणत्याही गटाबरोबर तडजोड करून एकमेकांविरुद्ध लढू लागले. त्यामुळे 22 ग्रामपंचायतीत गावपातळीवर सोयीने कार्यकर्त्यांनी आघाड्या केल्या आहेत. तरीही या आघाड्यांच्या विरोधात काही तरुणांनी सहभाग घेत पॅनेल उभा केले. 

15 मधील 10 सदस्य बिनविरोध झालेल्या भोसे ग्रामपंचायतीत पाच जागांसाठी लढत लागली असली तरी अपात्र अर्जावरून घेतलेल्या हरकती उच्च न्यायालयापर्यंत गेल्या. मरवडे येथे मोठ्या प्रमाणात विकासकामे केल्याचा दावा करत सत्ताधारी गट लढत देत आहेत. त्यांच्या विरोधात अनेकांनी आघाडी करत एकत्र येऊन लढा देत आहेत. त्यामुळे इथली लढत चुरशीची होत आहे. 

तामदर्डी, तांडोर, अरळी, सिद्धापूर या नदीकाठच्या गावांत वाळूतून मिळणारी माया आणि गौण खनिजच्या निधीमुळे तामदर्डी वगळता हा आखाडा तापू लागला आहे. तर माचणूर, हुलजंती येथे तीर्थक्षेत्र विकासच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मिळत असल्याने रस्सीखेच लागली आहे. तशीच चुरस नंदेश्वरमध्ये सुरू आहे. इथला मतदार ऊस तोडणीसाठी जरी गेला तरी त्यांना मतदानासाठी गावात आणले जाणार आहे. 

सिद्धापूरच्या गत निवडणुकीत एकत्र लढलेले यंदा एकमेकांविरोधात लढत आहेत. उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी एक जागा बिनविरोध करत ग्रामपंचायतीवरील सत्तेसाठी कंबर कसली आहे. तर हुलजंतीत आवताडे गट एकमेकाविरोधात दंड थोपटले असून, डोणज येथे प्रथमच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आखाड्यात उडी घेतली आहे. लेंडवे चिंचाळे येथे भालके व आवताडे गटात लढत लागली. घरनिकी येथे निम्म्याहून अधिक जागा बिनविरोध निघाल्या. 

गेल्या दहा वर्षांपासून निवडणुका खर्चिक होत चालल्या असून, मतदारांना खुश करण्यात उमेदवारांचे दिवाळे निघत आहेत. सरपंचपदाचे आरक्षण निश्‍चित नसल्याचे सर्वच उमेदवारांना खिसा मोकळा करावा लागत आहे. तर कोरोना संकटात लांबून नमस्कार केलेल्यांना आता निवडणुकीसाठी पायधरणी करावी लागत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर काही महिन्यात विधानसभेची पोटनिवडणूक लागणार आहे. आमदार भारत भालके व माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या निधनाने नव्याने नेतृत्वाची जबाबदारी घेतलेले विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके, पांडुरंग कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाचा कस लागणार असला तरी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांच्यासाठी पोटनिवडणूक व दामाजी कारखाना या दोन निवडणुकांमुळे त्यांच्याही नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वीच आमदार परिचारक गटाकडून "दामाजी'वरून आरोप- प्रत्यारोप झाले. या वर्षातील आखाडा मात्र राजकीयदृष्ट्या चर्चेचा ठरणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Gram Panchayat elections in Mangalwedha taluka are going to be a test for the Bhalke and Paricharak group