पंढरपुरात परिचारक, भालके व काळे गटासह स्थानिक आघाड्यांमुळे मोठी चुरस 

अभय जोशी 
Wednesday, 13 January 2021

आमदार प्रशांत परिचारक यांच्या खर्डी, आमदार (कै.) भारत भालके यांच्या सरकोली, कल्याणराव काळे यांच्या वाडीकुरोली यासह अनेक प्रमुख गावांत अतिशय चुरशीने निवडणूक होत असल्याने तालुक्‍यातील राजकीय वातावरण तापले आहे. तालुका पातळीवरील विविध संस्थांवर नेतृत्व करणाऱ्या मंडळींच्या गावांतही निवडणुकीमुळे वातावरण ढवळून निघाले आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : तालुक्‍यातील एकूण 94 ग्रामपंचायतींपैकी 72 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी जैनवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने उर्वरित 71 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. तालुक्‍यातील जवळपास 75 टक्के ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असल्याने संपूर्ण तालुक्‍यात सध्या निवडणुकीचा ज्वर दिसत आहे. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी आपापल्या सोयीने स्थानिक पातळीवर आघाड्या तयार केल्या आहेत. त्यामुळे अपवाद वगळता कोणत्याही गावात नेत्यांचा गट एकसंघ राहिलेला नाही. कुठे नातेवाईक एकत्र आले आहेत तर कुठे जवळचे नातेवाईकच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे निवडणुकीनंतर तालुका पातळीवरील कोणत्या नेत्याच्या बाजूने कौल मिळेल, हे सांगणे देखील मुश्‍किलीचे ठरणार आहे. काही गावांत नव्या तरुण चेहऱ्यांना जाणीवपूर्वक संधी देण्यात आली आहे तर काही ठिकाणी जुन्याच मंडळींनी पॅनेलमधून स्थान मिळवले आहे. 

आमदार प्रशांत परिचारक यांच्या खर्डी, आमदार (कै.) भारत भालके यांच्या सरकोली, कल्याणराव काळे यांच्या वाडीकुरोली यासह अनेक प्रमुख गावांत अतिशय चुरशीने निवडणूक होत असल्याने तालुक्‍यातील राजकीय वातावरण तापले आहे. तालुका पातळीवरील विविध संस्थांवर नेतृत्व करणाऱ्या मंडळींच्या गावांतही निवडणुकीमुळे वातावरण ढवळून निघाले आहे. प्रचाराची रंगत आरोप- प्रत्यारोपांमुळे वाढली असून तालुक्‍यातील दिग्गज मंडळींनी गावात आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. कोणत्याही परिस्थितीत गावची सूत्रे आपल्याच हाती राहिली पाहिजेत या विचाराने गावागावातील नेतेमंडळींनी बाजी मारण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. "हम किसीसे कम नही' असे म्हणत काही ठिकाणी गावातील तरुणांनी पुढे येत वर्षानुवर्षाची सत्ता पालटण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. 

तालुक्‍यात निवडणूक होत असलेल्या 71 गावांमधील 17 वॉर्ड बिनविरोध झाले आहेत. अनेक महत्त्वाच्या गावांत एकमेकांचे नातलग आमने-सामने उभे आहेत. कासेगाव प्रमाणे काही ठिकाणी वर्षानुवर्षे राजकीय मतभेद असलेल्या मंडळींनी एकत्र येऊन पॅनेल उभा केली आहेत. बहुतेक ठिकाणी रस्ते, वीज, पाणी, घरकुल, रेशन धान्य दुकान या मुद्द्यावरून प्रचारात रंगत आली आहे. 

आमदार प्रशांत परिचारक यांच्या खर्डी गावात अनेक वर्षांपासून परिचारक गटाचे वर्चस्व अबाधित आहे. यंदा तिथे परिचारक, भालके आणि काळे गटाने एकत्र येत आघाडी करून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला; परंतु या प्रयत्नास यश आले नाही. तिथे एकूण 15 पैकी परिचारक गटाचे 3 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. या आघाडीच्या विरोधात जागृत ग्रामविकास पॅनेलने आठ उमेदवार तर आवताडे गटाने आठ उमेदवार उभे करून पर्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. 

आमदार (कै.) भारत भालके यांच्या सरकोली गावात भालके, परिचारक आणि काळे गटातील बहुतांश मंडळींनी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. तथापि सात उमेदवार बिनविरोध विजयी झाले आणि उर्वीरत सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. 

सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या वाडीकुरोली गावात कल्याणराव काळे आणि युवा नेते समाधान काळे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने यंदा प्रथमच महिलाराजचा नारा दिला आहे. त्यांनी सर्व नऊ जागांवर महिलांना संधी दिली आहे. त्यांच्या विरोधात आमदार परिचारक व आमदार बबनराव शिंदे यांना मानणाऱ्या मंडळींनी पॅनेल उभा केले आहे. 

पांडुरंग कारखान्याचे उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख यांच्या कासेगावात वसंतराव देशमुख आणि श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक विजयसिंह देशमुख हे राजकीय विरोधक एकत्र आले आहेत. तिथे विजयसिंह देशमुख यांचे बंधू जयसिंह देशमुख यांनी अन्य काही मंडळींना बरोबर घेऊन विरोधी आघाडी मैदानात उतरवली आहे. 

जिल्हा परिषदेचे अनेक वर्षे अध्यक्ष म्हणून काम केलेल्या (कै.) यशवंतभाऊ पाटील यांच्या भोसे गावात त्यांचे पुत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राजूबापू पाटील यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. त्या ठिकाणी 11 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरीत सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. या वेळी तिथे दोन उमेदवार वगळता नवीन व तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तिथे (कै.) राजूबापू पाटील यांच्या पश्‍चात त्यांचे पुत्र ऍड. गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या गटाने विजयाचा निर्धार केला आहे. 

तालुक्‍यातील सर्वात मोठ्या करकंब ग्रामपंचायत निवडणुकीत मारुती देशमुख आणि नरसाप्पा देशमुख या सख्ख्या भावांच्या दोन प्रमुख गटांत काट्याची टक्कर होत आहे. विशेष म्हणजे दोन्ही देशमुख बंधूंनी आपापल्या घरातील तीन-तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. सरपंच पदाचे आरक्षण महिला सर्वसाधारणसाठी निघाल्यास आपल्या घरातील महिलेला संधी मिळू शकते, या विचाराने दोन्ही बंधूंनी आपल्या घरातील महिलांना देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. श्री विठ्ठल कारखान्याचे माजी उपाध्यक्ष (कै.) कृष्णातभाऊ पुरवत यांच्या घरातही निवडणुकीच्या निमित्ताने दुही निर्माण झाली आहे. पंचायत समितीचे सदस्य राहुल पुरवत आणि अभिषेक पुरवत या काका-पुतण्यांमध्ये लढत होत आहे. करकंबमध्ये 17 जागांसाठी 43 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. निवडणुकीपूर्वी मोठा गाजावाजा केलेल्या तिसऱ्या आघाडीने सर्व उमेदवारांचे अर्ज मागे घेतले आहेत. 

तालुक्‍यातील भाळवणी येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांनी परिचारक, काळे गटाच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेतले आहे. तिथे त्यांच्या विरोधात तिसऱ्या आघाडीने दंड थोपटले आहेत. 

तालुक्‍यातील प्रमुख गावांपैकी एक असलेल्या भंडीशेगावात भालके आणि परिचारक गटांच्या कार्यकर्त्यांनी युती करत श्रीनाथ ग्रामविकास पॅनेल उभा केले आहे. त्यांच्या विरोधात काळे आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दंड थोपटत भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल उभा करून चुरस निर्माण केली आहे. दोन्ही बाजूने तरुण आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. 

जैनवाडी चाळीस वर्षांनंतर बिनविरोध 
जैनवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक यंदा प्रथमच बिनविरोध झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ऍड. दीपक पवार आणि गावातील ज्येष्ठ मंडळींनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश आले. 

डीव्हीपी उद्योग समूहाचे प्रमुख अभिजित पाटील यांनी पंढरपूर तालुक्‍यातील ज्या ग्रामपंचायती बिनविरोध होतील त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे तालुक्‍यातील कोणकोणत्या ग्रामपंचायती हे बक्षीस मिळवणार अशी उत्सुकता निर्माण झाली होती. परंतु 72 पैकी केवळ जैनवाडीकरांनी एकत्र येत निवडणूक बिनविरोध केली आणि श्री. पाटील यांच्या हस्ते एक लाखाचे बक्षीस मिळवले. 

तालुक्‍यातील निवडणूक होत असलेल्या 71 पैकी प्रमुख ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे 
खर्डी, सरकोली, करकंब, भोसे, कासेगाव, भाळवणी, भंडीशेगाव, वाडीकुरोली, पटवर्धनकुरोली, पिरोचीकुरोली, गादेगाव, सुस्ते, बाभुळगाव, रोपळे, देगाव, उपरी, ओझेवाडी, रांझणी, नारायण चिंचोली, फुलचिंचोली, सोनके, बोहाळी, उंबरगाव, तिसंगी, खेडभाळवणी वाखरी, 

प्रशासकीय यंत्रणा सज्ज 
पंढरपूर तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 348 मतदान केंद्रांचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी 17 वॉर्ड बिनविरोध झाल्याने 331 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी टपाल मतदानाची मागणी केलेल्या कर्मचाऱ्यांना जवळपासच्या गावात नियुक्त केले जाणार असून त्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करून त्यांचे मतदान करून घेतले जाणार आहे. यासाठी संबंधितांना एक तासाची मुभा देऊन आवश्‍यक ती मदत केली जाणार आहे. तहसीलदार विवेक साळुंखे, निवडणूक नायब तहसीलदार एस. पी. तिटकारे यांच्या मार्दर्शनाखाली निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. 

ठळक...

  • तालुक्‍यातील 94 पैकी 71 गावात होत आहे निवडणूक 
  • जैनवाडी ही एकमेव ग्रामपंचायत झाली बिनविरोध 
  • परिचारकांच्या खर्डीत तर भालकेंच्या सरकोलीतही रंगत 
  • कल्याणराव काळेंच्या वाडीकुरोलीत काळे पॅनेलकडून सर्व जागांवर महिलांना संधी 
  • करकंबमध्ये सख्ख्या भावांसह अनेक नातेवाइकांत लढत 
  • भोसेत केवळ सहा जागांसाठी होतेय निवडणूक 
  • अनेक गावांत भालके, परिचारक आणि काळे गटाच्या स्थानिक आघाड्या 
  • शिवसेनेचे वाखरीमध्ये दोन उमेदवार बिनविरोध 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the Gram Panchayat elections in Pandharpur attention was drawn to the local panel along with large groups