खून करून 'तो' स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाला 

दत्तात्रय खंडागळे 
बुधवार, 20 मे 2020

एक हजार रुपयांच्या कारणावरून खून 
किरण कोळी याने उद्धव ऊर्फ अण्णा साखरे यांच्याकडून 15 दिवसांपूर्वी एक हजार रुपये उसने घेतले होते. या एक हजार रुपयातील किरण कोळी यांनी 19 मे रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास भाजी मार्केटमध्ये 500 रुपये परत दिले होते. एक हजार रुपयांच्या कारणावरून हा खून झाला आहे. 

सांगोला (जि. सोलापूर) : उसने घेतलेल्या एक हजार रुपयातील राहिलेल्या 500 रुपयांसाठी मोबाईल हिसकावून घेतल्याच्या कारणावरून व भांडणाचा राग मनात धरून एकाने डोक्‍यात दगड मारून खून केल्याची घटना आज (ता. 20) पहाटे पाचच्या सुमारास सांगोला येथील मार्केट यार्ड परिसरात घडली आहे. उद्धव ऊर्फ अण्णा मोहन साखरे (रा. पिंपळनेर, ता. माढा) हा असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. 
किरण वसंत कोळी (वय 40, रा. वाणीचिंचाळे, ता. सांगोला) याने उद्धव ऊर्फ अण्णा मोहन साखरे (वय 38, रा. पिंपळनेर, ता. माढा) यांच्याकडून 15 दिवसांपूर्वी एक हजार रुपये उसने घेतले होते. या एक हजार रुपयातील किरण कोळी यांनी 19 मे रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास भाजी मार्केटमध्ये 500 रुपये परत दिले होते. या वेळी उद्धव साखरे याने उरलेले पैसे घेण्यासाठी किरण कोळी याचा मोबाईल हिसकावून घेतला. तसेच तो मोबाईल परत मागितला असता उद्धव साखरे याने आरोपीस शिवीगाळ केली. तसेच तुला सांगोल्यात जाऊ न देण्याची व बघून घेण्याची धमकी दिली होती. याचा राग मनात धरून आरोपी किरण कोळी याने आज (ता. 20) पहाटे पाच ते साडेपाचच्या सुमारास उद्धव साखरे यांच्या चेहऱ्यावर व डोक्‍यात दगड मारून त्यास गंभीर जखमी करून जीवे ठार मारले व स्वतःहून पोलिस स्थानकात हजर झाला. याबाबत भानुदास बजरंग रणदिवे यांनी फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर तपास करीत आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He appeared at the police station on his own by murder